दोन्ही शिवसेनेकडून आज शक्तिप्रदर्शन; दसरा मेळाव्यात सोडणार एकमेकांवर टीकेचे बाण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून दुसऱ्या वर्षीच या दसरा मेळाव्याची सुरुवात केली
दोन्ही शिवसेनेकडून आज शक्तिप्रदर्शन; दसरा मेळाव्यात सोडणार एकमेकांवर टीकेचे बाण

शिवसेना आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे अतुट असे नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच लोकांच्या मनात अंगार फुलविला. लाखो शिवसैनिक याच दसरा मेळाव्यातून स्फूर्ती घेऊन तयार झाले, जे आधीच शिवसैनिक होते. त्यांना याच मेळाव्यातून दिशा मिळत गेली. मात्र दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि एकाचे दोन दसरा मेळावे झाले. शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार याचा वाद तर थेट न्यायालयापर्यंतही पोहोचला होता. मात्र या वर्षी सामोपचाराची भूमिका घेत शिंदे गटाने संघर्ष टाळत त्यांचा मेळावा आझाद मैदान येथे घेण्याचे ठरविले आहे, तर उद्धव ठाकरे शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क येथेच होणार आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल करणार हे तर निश्चितच आहे, पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते करत असलेल्या विविध पक्षांसोबतच्या आघाड्या आदींवर देखील भाष्य करतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याची भूमिका मांडतील. मात्र दोन्ही बाजूंनी जोरदार गर्दी जमवून मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे हे मात्र निश्चित.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून दुसऱ्या वर्षीच या दसरा मेळाव्याची सुरुवात केली. आपले ज्वलंत विचार ते या मेळाव्यात मांडत. केवळ तीन प्रसंग वगळता दसरा मेळाव्यात कायम सातत्य होते. शिवसैनिक विचारांचे सोने लुटायला या मेळाव्यात येत असत. शिवसेनेच्या जडणघडणीत या दसरा मेळाव्याचे मोठे स्थान आहे. ज्यांचा शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नव्हता असेही अनेक जण या मेळाव्याला केवळ बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी जात असत. मात्र दीड वर्षापूर्वी शिवसेनेत बंड झाले आणि दसरा मेळावेही दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले. शिवाजी पार्कवरून देखील दोन्ही गटात संघर्ष झाला. गेल्या वर्षी शिंदे गटाचा मेळावा बीकेसी इथे झाला होता. या वर्षी शिंदे गटाने सामोपचाराची भूमिका घेत आझाद मैदान येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.

उद्धव ठाकरे हे मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मेळाव्यासाठी लाखाच्या वर शिवसैनिक जमतील, अशी अपेक्षा आहे. भव्य स्टेज तर उभारण्यात आले आहेच पण येणाऱ्या शिवसैनिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची देखील सोय करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे देखील मेळाव्यात भाषण होणार आहे. आगामी निवडणुकांचे वर्ष लक्षात घेता उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडतील. शिंदे गटावर प्रहार करण्यासोबतच मुख्य हल्ला भाजपवरच असणार हे उघड आहे. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कम्युनिस्ट, समाजवादी, वंचित बहुजन आघाडी अशा अनेक पक्षांशी हातमिळवणी केली आहे. शिवसेनेच्या मूळ भूमिकेपासून विपरीत भूमिका असणाऱ्या या पक्षांशी का हातमिळवणी करावी लागली याचे स्पष्टीकरणही ते कदाचित करतील. महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न, कंत्राटी नोकर भरती, केंद्र सरकार आदी विविध विषयांवर ते टीकास्त्र सोडतील.

दुसरीकडे शिंदे गटाने देखील जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी ५२०० पेक्षा जास्त बसेस घेऊन येणार आहेत. तसेच सुमारे ८-१० हजार छोट्या चारचाकी वाहनांमधून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत. मेळाव्यासाठी विदर्भातून २ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. तसेच नागपूरजवळील भागातून सुद्धा बहुसंख्य लोक रेल्वेने येणार आहेत. दसरा मेळाव्याला मुंबईबाहेरून येणाऱ्या लोकांकरिता वाशी, मुलुंड, पडघा, दहिसर चेकनाका येथे चहापान व अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आझाद मैदानाच्या बाजूच्या मैदानात सुद्धा तशी व्यवस्था केलेली आहे. आझाद मैदानामध्ये वैद्यकीय सुविधेसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ५० डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर कार्डियाक रुग्णवाहिका, नियमित रुग्णवाहिकांची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून फायर ब्रिगेडची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in