
मुंबई : एअर इंडियाच्या वैमानिक तरुणीने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराला दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. टी. आगलावे यांनी आरोपी आदित्य पंडितची जामीनावर सुटका केली.
मरोळ परिसरातील 'कनकिया रेन फॉरेस्ट' इमारतीत भाड्याच्या घरात राहणारी २५ वर्षीय वैमानिक सृष्टी तुली ही २५ नोव्हेंबरला पहाटे मृतावस्थेत आढळली होती. सृष्टीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
सृष्टीच्या आत्महत्येपूर्वी पाच-सहा दिवस आदित्य हा तिच्यासोबत एकाच खोलीत राहत होता. मात्र, घटनेच्या दिवशी आरोपी आदित्य पंडित दिल्लीला गेला. आदित्य आणि तुली यांच्या जेवणाची आवड वेगवेगळी होती. यावरून त्यांच्यात वाद झाला होता, असे सृष्टीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य पंडितविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.