मुंबई : गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर रिक्षाचालकाने त्याच हत्याराने स्वत:ला दुखापत करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला तर प्रियकरावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
मृत प्रेयसीचे नाव मयनाबाई गिरी तर आरोपी प्रियकराचे नाव बाबूराव मोरे आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कांदिवलीतील आकुर्ली रोड, क्रांतीनगरात घडली. मयनाबाई आणि बाबूराव गेल्या तीन वर्षांपासून ते दोघेही लिव्ह अँड रिलेशनशीपमध्ये राहत होते. मयनाबाई आणि बाबूराव यांच्यात तिच्या पहिल्या पतीवरून भांडण झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात मयनाबाईच्या गळ्यावर सुरीने वार केले, त्यानंतर त्याने त्याच सुरीने स्वत:वरही वार केले.