
मुंबई : भाजपने कायमच धार्मिक ध्रुवीकरण करून ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे. परिणामी, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्याक समूहाच्या विरोधात द्वेषापोटी केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांत वाढ झाली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
‘‘गुजरात नरसंहाराच्या २००२ च्या मॉडेलनेच भाजप-आरएसएसला केंद्रात सत्तेत बसविले. आता तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे, असे आंबेडकर म्हणाले. ईशान्य भारतातील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा मोर्चे व आंदोलन करून व्यक्त होत आहे. या प्रश्नाकडे राज्यातील पोलिसांनी संवेदनशील दृष्टिकोनातून पाहायला हवे. राज्यातील सत्ताधारी मंडळींनी हा प्रश्न गांभीर्याने पाहायला हवा, असे आंबेडकर म्हणाले.
‘‘मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की, गुजरातमधील २००२च्या हिंसाचाराशी त्यात बरेच साधर्म्य आहे. द्वेष आणि जातीवादाची जी दुकाने आहेत, त्या व्यापाराचे सर्वात मोठे ठेकेदार दिल्लीत बसले आहेत. एक धर्मनिरपेक्ष संघराज्य म्हणून भारताच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईशान्येतील परिस्थिती गंभीर आहे. त्याचा विचार करून मार्ग काढायला हवा, असे आंबेडकर म्हणाले.
‘‘भीमा-कोरेगावच्या प्रश्नावर तत्कालीन सरकारने कठोर भूमिका घेतली असती तर संभाजी भिडे यांना महापुरुषांबद्दल बिनधास्त वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे धाडस झाले नसते. समाजातील दुभंगलेपण देशासाठी बरे नाही,’’ असेही आंबेडकर यांनी सांगितले.