बेस्ट बसचा ब्रेक फेल;दुर्घटनेत पाच प्रवासी जखमी

दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बेस्ट बसचा ब्रेक फेल;दुर्घटनेत पाच प्रवासी जखमी

शिवशाही प्रकल्प ते कुर्ला पश्चिम स्थानकादरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस रुट नंबर ३२६ बस क्रमांक एमएच ० - एपी ०४७६ या बसचा संतोष नगर, दिंडोशी येथे दुपारी ३.३० वाजता ब्रेक फेल झाला. मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत बसचा चालक व वाहकासह पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत रिक्षा व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कुर्ला डेपोची गाडी शिवशाही प्रकल्प ते कुर्ला पश्चिम स्थानकादरम्यान धावणारी रुट नंबर ३२६ ची बस संतोष नगर दिंडोशी येथील अपघाती वळणाच्या रस्त्यावर आल्यानंतर गाडीचा ब्रेक फेल झाला.

ही बस प्रवाशांनी खच्चून भरलेली होती; मात्र वाहनचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले; मात्र चालक कुंडलिक किसन धोंगडे (४३) व कंटक्टर आबासाहेब कोरे (४५) या दोघांसह रिक्षा चालक होवाळ पांडे (४५), गोविंद प्रसाद पाठक (८०), रजनिश कुमार पाठक (३७) हे जखमी झाले असून, त्यांना ट्रॉमा केअर व वेदांत या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, बसचा ब्रेक फेल झाल्याने बस झाडावर आदळली. यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांनाही बस धडकली असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनधिकृत फेरीवाले व पार्किंगवर कारवाई शून्य!

हा परिसर अपघाती उतार वळणाचा असून, या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालय व संबंधित पोलीस प्रशासनाला तक्रारी देऊनही तेथील अनधिकृत अतिक्रमणे, वाहन पार्किंग ‘जैसे थे’ आहे. यामुळेच असे अपघात घडत आहे. अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असून प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते, असा आरोप गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी केला आहे.या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in