गोपनीय माहितीचे उल्लघंन; एशियन पेन्टसच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी अपहारासह फसवणूक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे
गोपनीय माहितीचे उल्लघंन; एशियन पेन्टसच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

मुंबई : शहरातील एका नामांकित पेन्टस कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एशियन पेन्टस कंपनीच्या सेल्स अँड मार्केटिंग अधिकारी सुबोध जैन याच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुबोध जैनवर कंपनीच्या गोपनीय माहितीचे उल्लघंन करून कंपनीची सहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहे. सांताक्रुझ येथील वाकोला, हयात हॉटेलजवळ एशियन पेन्टस हाऊस असून, सुबोध जैन हा गेल्या बारा वर्षांपासून सेल्स अँड मार्केटिंग विभागाचा प्रमुख आहे. त्याला दुसऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची ऑफर आली होती. त्यामुळे त्याने जुलै महिन्यात कंपनीत राजीनामा दिला होता. कंपनीच्या नियमांनुसार राजीनामा दिल्यानंतर सुबोध जैन याच्या संगणीकृत कारवाया आयटी एक्सपर्टकडून ब्लॉक करून लेखा परिक्षण करण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सुबोधचे तीन ईमेल आयडी दिसून आले होते. या तिन्ही मेल आयडीवरून त्याने एशियन पेन्टस कंपनीच्या डिलर, व्हेंडर तसेच कॉन्ट्रॅक्टर आदीची गोपनीय माहिती आणि मालकी हक्काबाबतची माहिती अनधिकृतपणे त्याच्या संगणकीय प्रणालीमार्फत ट्रान्स्फर केली होती. या प्रकाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पवन शुक्ला यांनी सुबोध जैनविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणूक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in