आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होत नाही, त्यामुळे स्तनपान हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार आहे

आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होत नाही, त्यामुळे स्तनपान हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार आहे
आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होत नाही, त्यामुळे स्तनपान हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार आहे

''स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'' असे म्हंटले जाते. याची प्रचिती आईच्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक मुलाला अगदी आपल्या जन्मापासून येत असते. जन्मताच आईला कवटाळून आईच्या अमृततुल्य अशा दूधाच्या प्रत्येक थेंबातुन आपली वाढ होत असते. आईच्या दुधाची तुलना अमृताशी केली जाते. स्तनपान हा निसर्गाचा एक मार्ग असून, ती एक प्रकारची ठेव आहे. हीच अनमोल ठेव जपण्यासाठी आणि याबद्दल जनजागृती होण्यासाठी १ ते ७ ऑगस्ट हे सात दिवस ''जागतिक स्तनपान आठवडा'' म्हणून जगात साजरे केले जातात. आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होत नाही त्यामुळे स्तनपान हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार आहे. बाळाची शारिरिक व मानसिक रितीने योग्य वाढ होण्यासाठी आईचे दुध ही बाळाला आईने दिलेली अनमोल भेट आहे. स्तनपान म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा एक दुवा आहे असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही.

इटलीतील फ्लोरेंस येथे जागतिक आरोग्य संघटना, UNICEF आणि इतर संघटनांनी एकत्र येऊन इनोसेंटी डिक्‍लेरेशनवर स्तनपानाला महत्त्व देण्यासाठी, जनजागृतीसाठी शिक्कामोर्तब केले. हा सप्ताह लोकजागृतीसाठी १९९० पासून सुरू करण्यात आला. प्रारंभी १ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक स्तनपान दिन' म्हणून साजरा व्हावा, अशी संकल्पना होती. पुढे तिचे 'सप्ताहा'त रुपांतर झाले व पहिला सप्ताह १९५२ मध्ये साजरा झाला. 'दी र्वल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग अँक्शन' ही मलेशियास्थित संस्था १९९१ पासून या सप्ताहासंबंधी विविध घोषणा जाहीर करून १२० देशांमध्ये जनजागृती करीत आहे. सध्या हा सप्ताह जागतिक आरोग्य संघटना आणि 'फूड अँड अँग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जगभर मानला जातो. सरकारी, निमसरकारी, खासगी तसेच स्थानिक संघटना आणि चळवळींना हाताशी घेऊन 'वाबा' ही संस्था या आठवड्यात कार्यक्रम नि घडामोडी सुसुत्रित करीत असते. दरवर्षी स्तनपानाला जोडून वेगवेगळी संकल्पना घेऊन स्तनपानाचे समर्थन, संरक्षण, वृद्धीकरण करण्यासाठी जगभरात खुप सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु आजतागायत स्तनपानाचे महत्त्व घरोघरी पोहचू शकले नाही. पहिल्या काही तासांमध्ये बाळाला स्तनपान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वारंवार अधोरेखित केले जात असूनही सध्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यासाठी विशेष प्रयत्न होताना मात्र फारसे दिसत नाहीत. नवजात बालकाला स्तनपान का, कसे आणि केव्हा करावे याबाबत मातांच्या मनामध्ये असणारे संभ्रम, शंकाकुशंकांचे निरसन करण्याची व्यवस्था काही मोजकी रुग्णालये वगळता अन्य ठिकाणी उपलब्ध नाही.

स्तनपानाविषयीची चळवळ उभारण्याची गरज

वैवाहिक आयुष्याची नवी नवलाई संपली की अनेकांकडून ‘गुड न्यूज’ कधी अशी विचारणा होते. त्याप्रमाणे काही काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात. फार झालं तर नैसर्गिक प्रसूतीसाठी व्यायाम, योगा किंवा अन्य काही थेरपींचा उपयोग होतो का? याविषयी चर्चा होत असते. परंतु प्रसूतीनंतरचा सर्वात महत्त्वाचा क्षण ‘स्तनपान’ याबाबत मात्र कोणीच फारसे बोलताना दिसत नाही. बाळाला जवळ घेतलं की बाळ आपोआपच दूध प्यायला लागतं असा भ्रम बहुतेक महिलांचा असतो. परंतु प्रत्यक्षात बाळाला घ्यायचं कसं? धरायचं कसं? यांसारखे अनेक प्रश्न नंतर धांदल उडवून लावतात. याचाच परिणाम दूध येण्यावरही होतो. यातील गुंतागुंत अधिकच वाढत जाते. दरम्यान, प्रसूतीनंतर स्तनपानाविषयी फारसे गांभीर्य नसल्याने महिलांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्तनपानाविषयीची चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

युरोपमध्ये स्तनपानाचा दर सर्वांत कमी

युरोपमध्ये ७० टक्के स्त्रिया बाळांना स्तनपान देतात. पण यातील बऱ्याच महिला बाळाच्या जन्मानंतर काही आठवडयांतच स्तनपान देणं बंद करतात. याठिकाणी मूल सहा महिन्याचे झाल्यावर फक्त एक तृतीयांश बालकांना आईचं दूध मिळतं आणि एक वर्षांचं झाल्यावर हे प्रमाण ०.५% इतक कमी येते. दरम्यान, २०१६ साली प्रकाशित झालेल्या एका आरोग्य अहवालानुसार जागतिक पातळीवर युरोपचा स्तनपानाचा दर सर्वांत कमी आहे.

स्तनपानाचे महत्त्व

- आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारक शक्ती वाढते.

- आईच्या दुधाचे तापमान योग्य प्रमाणात असते व लगेच स्तनांमधून बाळाच्या मुखात गेल्यामुळे बाळाला बाधत नाही. इन्फेक्‍शन होत नाही.

- आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी अत्युत्तम प्रथिने असतात.

- अनुकुल स्वरूपात फॅटस्‌ व कॅल्शिअम असते.

- या दुधातील काही विशिष्ट घटक मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात.

- बाळ जर वेळेआधी जन्मले असेल तर नैसर्गिकरित्याच आईच्या दुधात बदल होतात व त्या कमी वजनाच्या बाळासाठी हे दूध अत्यंत पोषक असते.

- आईच्या दुधात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, हार्मोन्स, संप्रेरके योग्य प्रमाणात असतात.

- या सर्व महत्त्वपूर्ण घटकांमुळे बाळाची मानसिक, शारिरिक, बौद्धिक वाढ चांगली होते.

- वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांपासून बाळाचे रक्षण आईच्या दूधामुळे होते.

- आईच्या दुधामुळे बाळाचे पोट तर भरतेच पण बाळ अत्यंत शांत व समाधानी असते.

- स्तनपानामुळे बाळ आईच्या खुप जवळ येते. व यामुळे फलदायी पालकत्वाकडे पहिले पाऊल पडते.

स्त्रीमध्ये जन्मजात असलेल्या ममत्वाच्या भावनेला एक नवा आयाम मातृत्वामुळे मिळतो. स्तनपान ही मातृत्वामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब आहे. बाळ मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्तनपान आई आणि मूल असे दोघांसाठी फायदेशीर आहे. जन्मानंतर पहिले सहा महिने तरी मुलाला केवळ आईचे दूधच दिले गेले पाहिजे. कारण आईचे दुध मुलाला विविध संक्रमण आणि अनेक आजारांपासून दूर ठेवते. याशिवाय भविष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अनेक असाध्य रोगांपासून दूर ठेवण्यासाठी स्तनपान महत्वाचे ठरते.

- प्रीती जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ, नवी मुंबई

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in