झोपडपट्टी भागातील व्‍यावसायिक मालमत्ता कर कक्षेत आणा - आयुक्त गगराणी; मालमत्ता कर भरणा सुलभतेकरिता आवश्यक प्रयत्नांवर BMC चा भर

मुंबईकरांना पुरविल्‍या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधांच्‍या विकासासाठी कर उत्‍पन्‍न गरजेचे आहे.
भूषण गगराणी
भूषण गगराणीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईकरांना पुरविल्‍या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधांच्‍या विकासासाठी कर उत्‍पन्‍न गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांना मालमत्ता कराची देयके वेळेवर मिळावीत, करभरणा अधिकाधिक सुलभ व्‍हावा यासाठी अधिक प्रयत्‍न करावेत तसेच झोपडपट्टी भागातील व्‍यावसायिक मालमत्तांना करकक्षेत आणावे, असे आदेश पालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्‍या उत्‍पन्‍नाचा प्रमुख स्रोत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्‍या करनिर्धारण व संकलन खात्‍याकडे २ लाख ४३ हजार ९८९ मूळ मालमत्तांची नोंद आहे. त्‍यात निवासी आणि अनिवासी (व्यावसायिक) मालमत्तांचा समावेश आहे. शहर विभागात जुन्‍या मालमत्तांचा विकास होऊन उत्तुंग इमारती तयार होत आहेत. उपनगरांमध्‍येदेखील नवीन मालमत्तांमध्‍ये वाढ होत आहे. मालमत्तांचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी महानगरपालिकेने टप्‍पे निश्चित केले आहेत. त्‍याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कर आकारणीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सर्व नवीन बांधकामे, विद्यमान बांधकामे आणि मालमत्तेतील बदल, जर काही असतील तर, याची माहिती इमारत प्रस्‍ताव, इमारत व कारखाने विभागाकडून उपलब्ध करून घेतली पाहिजे. त्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या विविध विभागांमध्‍ये समन्‍वय साधणे अत्यावश्यक आहे,  असे गगराणी यांनी नमूद केले. मालमत्ताकर ऑनलाईन पद्धतीने भरण्‍याची प्रक्रिया पालिकेने सुलभ केली असल्याचे सांगण्यात येते.

logo
marathi.freepressjournal.in