नातवाला दिल्लीतून मुंबईला आणा, ९० वर्षीय आजीची भेट घडवून द्या; HC चा महत्त्वपूर्ण आदेश

आजींच्या मुलाचा विवाह २००७ मध्ये झाला होता, २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला. तोपर्यंत दांम्पत्य आजीसोबत एकत्रच राहत होते. पण, २०१३ मध्ये आजींच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर सुनेने सासरशी सर्व संबंध तोडले आणि नातवाची व आजीची भेट, संवाद अथवा संपर्क होऊ दिला नाही. नातवाचा फोटोही देण्यास नकार दिला, उलट...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : मुलाच्या मृत्यूनंतर १४ वर्षीय नातवाच्या भेटीसाठी आसुसलेल्या ९० वर्षीय आजीबाईने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्यायालयाने आजीचे नातवावरील प्रेम विचारात घेतले आणि दोघांची भेट घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आदेश दिले. आजी आणि नातवाची ख्रिसमसच्या निमित्ताने भेट घडवून आणण्याबरोबरच महिन्यातून दुसऱ्या किंवा चौथ्या रविवारी भेटण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. विभक्त दाम्पत्याच्या मुलांच्या कौटुंबिक नातेसंबंधाबाबत उच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

नातवाला दिल्लीतून मुंबईला आणा आणि त्याची ९० वर्षीय आजीसोबत भेट घडवून देण्याचे आदेश न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. नातवाच्या भेटीसाठी आसुसलेल्या आजीने हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मला सारखे नातवाला भेटावेसे वाटत आहे. मात्र तिच्या नातवाला तिला भेटण्यासाठी परवानगी दिली जात नाही, असा दावा याचिकेत केला होता. न्यायालयाने आजीच्या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि मुलाला त्याच्या आजीला भेटण्यासाठी आदेश दिला.

२००७ मध्ये झाला होता विवाह, सुनेने तोडले संबंध

आजींच्या मुलाचा विवाह २००७ मध्ये झाला होता, २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला. तोपर्यंत दांम्पत्य आजीसोबत एकत्रच राहत होते. पण, २०१३ मध्ये आजींच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर सुनेने सासरशी सर्व संबंध तोडले आणि नातवाची व आजीची भेट, संवाद अथवा संपर्क होऊ दिला नाही. नातवाचा फोटोही देण्यास नकार दिला आणि उलट ३० कोटी रुपयांची मागणीही केली, असा आरोप याचिकेत आहे.

आजीचा तपशील पोलिसांकडे राहणार

ख्रिसमसच्या सुट्टीत अल्पवयीन नातवाला मुंबईत आणले जावे आणि सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत याचिकाकर्त्या आजीच्या निवासस्थानी सोडले जावे. यादरम्यान आजीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिच्या नातवासोबत राहण्याची परवानगी असेल, असे न्यायालयाने आदेशपत्रात म्हटले आहे. तसेच मुलाच्या आईला तिचा दिल्लीचा पत्ता आणि संपर्क तपशील पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्या आजीने उच्च न्यायालयाच्या याचिकेत पोलिसांना प्रतिवादी केले होते. त्या पार्श्वभूमीवर निर्देश देत खंडपीठाने आजीची याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in