
मुंबई : राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे शिवसेना आणि मुस्लीम समाजात भिंत उभी करण्याचे काम केले आहे. पण आपल्याला ही भिंत तोडायची आहे. वर्षानुवर्षे अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले, मात्र आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या या अल्पसंख्यांकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
शिवसेनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या वतीने मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अल्पसंख्याक समाजातील तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते.
अठरापगड जाती-जमाती, सर्व धर्माच्या विकासाचे आमचे लक्ष्य असून शिवसेना अल्पसंख्याक समाजाच्या भक्कमपणे पाठीशी उभी आहे व भविष्यात पाठीशी उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळा ठाकरे व वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी कधीही एखादी व्यक्ती एखाद्या धर्माची आहे म्हणून तिला विरोध केला नाही. उलट आयुष्यभर माणुसकीचा धर्म हाच श्रेष्ठधर्म असल्याची शिकवण दिली. शिवसेनेत काम करणारे कायम पुढे जातात, कारण या पक्षात जात, धर्म पाहून पदे दिली जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष व नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश!
या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अल्पसंख्याक मुस्लीम समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल १९१९ लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात २१ नगरपालिकांचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध पक्षांच्या २१० नगरसेवकांचा समावेश आहे