रेसकोर्सवरील सेंट्रल पार्क योजनेत पारदर्शकता आणा! भाजपचे मुख्यमंत्री व आयुक्तांना पत्र

महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील सेंट्रल पार्कसाठी जागतिक खुली संकल्पना स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. तसेच या योजनेसाठी खुल्या जागेचे भवितव्य कंत्राटदारांना ठरवू देऊ नका...
रेसकोर्सवरील सेंट्रल पार्क योजनेत पारदर्शकता आणा! भाजपचे मुख्यमंत्री व आयुक्तांना पत्र

मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील सेंट्रल पार्कसाठी जागतिक खुली संकल्पना स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. तसेच या योजनेसाठी खुल्या जागेचे भवितव्य कंत्राटदारांना ठरवू देऊ नका, यात पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली आहे.

राज्य सरकारने महालक्ष्मी रेसकोर्स येथे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नार्वेकर यांनी मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना पत्र लिहून या योजनेत पारदर्शकता असावी. तसेच नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे. यापूर्वीही रेसकोर्सच्या विकासात पारदर्शकता यावी यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी यापूर्वी केली होती.

रेसकोर्सवर मुंबई सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना मुंबईकरांसाठी असेल, तर त्याची थीम ठरवण्यासाठी कंत्राटदारांनी नव्हे तर नागरिकांनीच काम करण्याची गरज आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या खुल्या जागेचे भवितव्य ठरवण्याची मुभा कंत्राटदारांना देऊ नये. सरकारने महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय उद्यानांच्या मानकांप्रमाणे अनोख्या कल्पना निर्माण करण्यासाठी जागतिक खुली संकल्पना स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे.

तसेच किमान ९० दिवसांचा कालावधी थीम आणि योजनांसाठी सूचना देण्यासाठी हवा तसेच सर्व संकल्पना तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय निवड समिती तयार करणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सेंट्रल पार्क योजनेबाबत मागणी करताना म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in