मुंबईतील रेल्वे स्थानकांची 'साहेबी' ओळख मिटणार; 'या' ७ स्टेशन्सची नावे बदलणार

करी रोड रेल्वे स्थानकाला ‘लालबाग’ तर मरीन लाईन्स स्थानकाला ‘मुंबादेवी’ यासह एकूण सात रेल्वे स्थानकांचे नामांतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांची 'साहेबी' ओळख मिटणार; 'या' ७ स्टेशन्सची नावे बदलणार

मुंबई : मुंबईची ‘लाइफलाईन’ म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकलच्या रेल्वे स्थानकांना असलेली ब्रिटिशकालीन ओळख पुसून टाकण्यात येणार असून, आता या रेल्वे स्थानकांना नवी ओळख मिळणार आहे. करी रोड, डॉकयार्ड रोड, मुंबई सेंट्रल, कॉटन ग्रीन अशा एकूण सात रेल्वे स्थानकांना नवी ओळख मिळणार आहे. रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावीत, अशी मागणी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून, या मागणीला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कॅबिनेटच्या निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामुळे मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचे लवकरच नामांतर होणार आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आजही ब्रिटिशकालीन नावाने ओळखली जातात. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांचे नामांतर करावे, अशी मुंबईकरांची मागणी आहे. करी रोड रेल्वे स्थानकाला ‘लालबाग’ तर मरीन लाईन्स स्थानकाला ‘मुंबादेवी’ यासह एकूण सात रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारच्या वतीने याआधीच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘नाना जगन्नाथ शंकरशेट’ रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ निर्णयानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार

भारताच्या पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी आहे. ही जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. या मागणीला तत्त्वत: मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. लवकरच याबाबत मंत्रिमंडळ निर्णय करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

या स्थानकांना मिळणार नवी ओळख

आधीचे नाव प्रस्तावित

करी रोड लालबाग

सँडहर्स्ट रोड डोंगरी

मरीन लाईन्स मुंबादेवी

चर्नी रोड गिरगाव

कॉटन ग्रीन काळाचौकी

डॉकयार्ड रोड माझगाव

किंग्ज सर्कल तीर्थंकर पार्श्वनाथ

मुंबई सेंट्रल नाना शंकरशेट

logo
marathi.freepressjournal.in