भावाने केली बहिणीची ८ लाख ३३ हजारांची फसवणूक

पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला
भावाने केली बहिणीची ८ लाख ३३ हजारांची फसवणूक

मुंबई : उत्तरप्रदेशातील कौंडर गावी जागा घेऊन घर बांधण्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार परळ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कौशल रामसंजीवन उपाध्याय या आरोपीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. कौशल हा तक्रारदार तरुणीच्या आईचा सख्खा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. संध्या विजयनाथ तिवारी ही महिला व्यवसायाने वकिल असून ती तिच्या कुटुंबीयांसोबत परळ परिसरात राहते. कौशल हा तिच्या आईचा भाऊ असून तो पूर्वी त्यांच्याच घरी राहून टॅक्सी चालवत होता. लग्नानंतर तो त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी निघून गेला होता.

२०१६ रोजी तिची आई आरती तिवारीला ब्रेन कॅन्सर झाला होता. तिला तिच्या मूळ गावी कोंडर येथे स्वतचे घर बांधण्यासाठी एक जागा घ्यायची होती. त्यामुळे तिने आईच्या इच्छेसाठी गावी घरासाठी जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिच्या आईने कौशलला ८ लाख ३३ हजार रुपये दिले होते. २०१८ रोजी तिच्या आईचे निधन झाले होते. तिच्या मृत्यूनंतर तिला तिचा मामा कौशलने त्याच्या नावाने गावी जागा घेतल्याचे समजले.

त्यामुळे तिने मामाकडे जागा द्या किंवा जागेसाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता; मात्र वारंवार संपर्क साधून त्याने त्याना जागेचा ताबा दिला किंवा घेतलेले पैसेही परत केले नाही. गावी घरासाठी जागा घेण्यासाठी कौशलने तिच्या आईकडून ८ लाख ३३ हजार रुपये घेतले होते. या पैशांचा त्याने परस्पर अपहार करून तिची फसवणुक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in