बिल्डर अविनाश भोसले यांना रुग्णालयात राहण्याची गरज नाही; वैद्यकीय समितीचे मत

आयएनएस अश्विनी रुग्णालयाचे ज्येष्ठ सर्जन यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय समितीत सात डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी भोसले यांच्या प्रकृती तपासणी करून सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर केला.
बिल्डर अविनाश भोसले यांना रुग्णालयात राहण्याची गरज नाही; वैद्यकीय समितीचे मत

चारुल शहा-जोशी/मुंबई

बिल्डर अविनाश भोसले यांना रुग्णालयात राहण्याची गरज नाही, असे मत आयएनएस अश्विनी रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिले आहे. २६ सप्टेंबर २०२२ पासून भोसले हे सेंट जॉर्जेस रुग्णालयात भरती आहेत, असा दावा सीबीआयने केला.

आयएनएस अश्विनी रुग्णालयाचे ज्येष्ठ सर्जन यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय समितीत सात डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी भोसले यांच्या प्रकृती तपासणी करून सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर केला. या अहवालाची प्रत तपास यंत्रणांना व बचाव पक्षाच्या वकिलांनाही दिली. या प्रकरणी न्यायालयाने निर्णय द्यायचा आहे.

या अहवालातील माहितीनुसार, भोसले यांना आणखीन रुग्णालयात राहण्याची गरज नाही. मात्र त्यांना जनरल ओपीडीतही उपचार होऊ शकतात. डॉक्टरांनी भोसले यांना काही चाचण्या करण्यास सांगितले. मात्र त्यांनी त्या करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आता अंतिम अहवाल कोर्टाला सादर केला.

डीएचएफएल - येस बँक खटल्याच्या सुनावणीत सीबीआयने याचिका दाखल केल्यानंतर विशेष न्यायाधीशांनी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले.

सीबीआयने सांगितले की, भोसले यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी २६ मे २०२२ अटक करण्यात आली. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भोसले यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना २८ जानेवारी २०२३ रोजी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ३१ मार्च २०२३ रोजी भोसले यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याच्या संशयावरून न्यायालयाच्या आदेशाशिवाय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर भोसले हे अनेक दिवस रुग्णालयात राहत होते, असे सीबीआयने सांगितले.

त्यानंतर सीबीआयने जे. जे. रुग्णालय किंवा सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय समिती बनवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या चार डॉक्टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय समिती बनवली. तिने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अहवाल सादर केला. त्यात भोसले यांच्या रुग्णालयात राहण्यावर शिक्कामोर्तब केले. या अहवालानंतर भोसले हे तीन महिने रुग्णालयात ॲॅडमिट होते, असे सीबीआयने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in