मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप परिसरात तीन अज्ञात बाईकस्वारांनी बांधकाम व्यावसायिकावर गोळ्या झाडून पळ काढला. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या बिल्डरवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक फ्रेंडी डिलीमा हा बंदरपाखाडी येथील गरुडा पेट्रोल पंपाजवळ त्याच्या गाडीत बसलेला असताना, बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या फ्रेंडी डिलीमा याच्या पोटात लागल्या आणि तो गंभीररित्या जखमी झाला. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती देताच चारकोप पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी फ्रेंडी डिलीमा याला तत्काळ बोरीवलीच्या ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी बारा पोलीस पथके तयार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त जाधव यांनी दिली.