बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जमीन अधिग्रहण पूर्ण; कंत्राटे प्रक्रिया आणि बांधकामही प्रगतिपथावर

१२०.४ किमीपेक्षा जास्त गर्डर्स लाँच केले गेले आहेत आणि ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे २७१ किमी पिअर कास्टिंग पूर्ण झाले आहे.
 बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जमीन अधिग्रहण पूर्ण; कंत्राटे प्रक्रिया आणि बांधकामही प्रगतिपथावर
Published on

कमल मिश्रा/मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी १०० टक्के भूसंपादन पूर्ण करून एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. सोमवारपर्यंत गुजरात, दादरा-नगर हवेली आणि महाराष्ट्रातील सर्व आवश्यक भूखंड यशस्वीरीत्या अधिग्रहित केले गेले आहेत. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपक्रमाच्या जलद प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कॉरिडॉरच्या गुजरात आणि महाराष्ट्र विभागांसाठी देण्यात आलेल्या सर्व नागरी कंत्राटांसह प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कच्या विकासात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. १२०.४ किमीपेक्षा जास्त गर्डर्स लाँच केले गेले आहेत आणि ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे २७१ किमी पिअर कास्टिंग पूर्ण झाले आहे.

त्याशिवाय सुरत आणि आनंदमध्ये प्रलंबित काँक्रीट ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरू झाले आहे. ही नाविन्यपूर्ण जपानी शिंकनसेन-प्रेरित ट्रॅक सिस्टीम भारतात प्रथमच वापरली जात आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे गुजरातमधील वलसाड येथील जरोली गावाजवळ ३५० मीटर लांबीचा आणि १२.६ मीटर व्यासाचा पहिला बोगदा केवळ १० महिन्यांत पूर्ण करण्यात आला आहे. गुजरातमधील सुरत येथील ७० मीटर लांबीचा आणि ६७३ मेट्रिक टन वजनाचा पहिला स्टील पूल उभारणे, हा प्रकल्पाच्या अभियांत्रिकी कार्यक्षमतेचा दाखला आहे.मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर भारतातील रेल्वे प्रवासात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. भूसंपादनाच्या यशस्वी पूर्ततेमुळे जलदगती बांधकाम उपक्रमांना गती मिळेल, ज्यामुळे मुंबई दरम्यान हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न साकार होईल. प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसे त्यातून वाहतूक पायाभूत सुविधाच वाढवणार नाहीत, तर आर्थिक विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले जाईल, असे नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

बीकेसी-शिळफाटा बोगद्याचे काम प्रगतिपथावर

या कॉरिडॉरवरील एकूण २४ नदीपुलांपैकी सहा नद्यांवर पुलांची कामेही पूर्ण झाली आहेत. भारतातील पहिल्या ७ किमी समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम, महाराष्ट्रातील बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या बोगद्याचे कामही प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे गुजरातमधील सर्व आठ हाय-स्पीड रेल्वे (एचएसआर) स्थानकांवर बांधकाम सुरू आहे. पायाभरणीच्या कामात लक्षणीय प्रगती आहे. मुंबई एचएसआर स्टेशनने उत्खननात भरीव प्रगती केली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन २०२६ मध्ये सुरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

logo
marathi.freepressjournal.in