सत्ताधारी खासदार-आमदारांकडूनच गुंडगिरी! - नाना पटोले

कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे.
सत्ताधारी खासदार-आमदारांकडूनच गुंडगिरी! - नाना पटोले
Published on

‘डोळे काढू, मुंबईत चालणे-बोलणे अवघड होईल, अशा धमक्या देणाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे. सत्ताधारी खासदार-आमदारच गावगुंडासारखे वागतात, हे अत्यंत गंभीर असून खुलेआम धमकी देणाऱ्या सत्ताधारी खासदार-आमदारांना चाप लावा’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.

नाना पटोले म्हणाले, “राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार व आमदारच डोळे काढण्याची, हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत. राज्य सरकारने अशा सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी. भाजपचे सरकार राज्यात आल्यापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांची गुंडगिरी वाढली आहे. ‘राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने लक्षात ठेवावे, जो अधिकारी हिंदू मुलांकडे वाकड्या नजरेने बघेल, त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत,’ अशा शब्दात भाजपचे आमदार धमकी देत असतील तर राज्यातील पोलीस अधिकारी काम कसे करतील,” असा सवाल पटोले यांनी केला.

महाराष्ट्र आहे की यूपी?

“एका केंद्रीय मंत्र्यानेही मुंबई, महाराष्ट्रात चालणे-बोलणे महाग होईल, असा इशारा विरोधी पक्षाला उद्देशून दिला. मुख्यमंत्र्यांच्या एका सरकारी आमदारानेच हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. हे कमी काय म्हणून अमरावतीमध्ये खासदार, आमदार राणा पती-पत्नी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालतात, सरकारी कामात हस्तक्षेप करतात. पोलीस आयुक्ताची बदली झाल्याचे आमदार स्वतःच जाहीरपणे सांगतात. दादरमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करतो हे काय चालले आहे, हा महाराष्ट्र आहे की उत्तर प्रदेश? राज्यात मोगलाई आली आहे का?” अशी भीती पटोले यांनी व्यक्त केली.

“राज्यातील दोन महिन्यांतील प्रकार पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे, याची कल्पना करवत नाही. महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम करू नका,” अशी टीका पटोले यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in