परळ येथे खासगी कार्यालयात २६ लाखांची घरफोडी

संपूर्ण कार्यालयाची पाहणी केल्यांनतर त्यांच्या ड्राव्हरमधून २६ लाख १६ हजाराची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले.
परळ येथे खासगी कार्यालयात २६ लाखांची घरफोडी
Published on

मुंबई : परळच्या एका खासगी कंपनीत सुमारे २६ लाखांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने बाथरुमच्या लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश करून ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.

ही घटना २८ नोव्हेंबर सायंकाळी सात ते २९ नोव्हेंबर सकाळी साडेआठच्या सुमारास परळ येथील डॉ. एस. एस. राव रोड, अमीत इंडस्ट्रियल इस्टेटच्या चवथ्या मजल्यावरील कार्यालय क्रमांक ४०१ आणि ४०२ मध्ये घडली. ६४ वर्षांचे वयोवृद्ध मुस्तानसीर हसनअली दाहोदवाला हे व्यावसायिक असून, त्यांच्या मालकीच्या तीन खासगी कंपन्या आहेत. परळ येथे तिन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यालय आहे.

मंगळवारी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी सात वाजता सर्वजण कार्यालय बंद करुन निघून गेले होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ते कार्यालयात आले होते, यावेळी त्यांना कार्यालयातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. संपूर्ण कार्यालयाची पाहणी केल्यांनतर त्यांच्या ड्राव्हरमधून २६ लाख १६ हजाराची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले.

logo
marathi.freepressjournal.in