मुंबई : फटक्यांच्या प्रदूषित हवेमुळे गर्भवती महिला जेष्ठ नागरिक दम्यासह विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडा, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सायंकाळी ८ ते १० या वेळेत फटाके फोडा, असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केले आहे.
वातावरणीय बदल, त्यासोबत बांधकामांमधून उडणारी धूळ आणि इतर कारणांनी वायू प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कार्यवाहीला फक्त शासकीय कामकाजापुरते मर्यादित न ठेवता त्याला आता लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. कारण लोकचळवळीतून केलेले कामकाज नक्कीच यशस्वी होते. बृहन्मुंबई महापालिकेने देखील प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले आहेत. विशेषतः प्रदूषण वाढीतील मोठा घटक ठरत असलेली धूळ पसरु नये म्हणून वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत आणि त्याचा चांगला परिणाम देखील दिसत आहे. असे असले तरी, एकट्या महाराष्ट्र शासनाने किंवा महानगरपालिकेने प्रयत्न करून चालणार नाही. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्व नागरिकांचे सहकार्य आणि सहभागाची जोड मिळाली तर प्रदूषण निश्चितच रोखता येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी सहकार्य करा
- उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दीपावली सणामध्ये नागरिकांनी सायंकाळी ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. तसेच पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी लक्षात घ्यावी, असे आयुक्त चहल यांनी म्हटले आहे.
- उच्च न्यायालय व महानगरपालिकेने प्रसारित केलेले विविध निर्देश, सूचना यांचे सर्व नागरिकांनी पालन केले, तर वायू प्रदूषण टाळणे शक्य होईल. कोविड कालावधीमध्ये देखील महापालिकेच्या विनंतीमुळे मुंबईकरांनी फटाके फोडणे टाळले होते, अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता, याचे स्मरण करुन देत तशाच प्रकारचे सहकार्य यंदा दिवाळी सणामध्ये करावे, अशी अपेक्षा देखील चहल यांनी व्यक्त केली आहे.