
मुंबई : सहलीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा बसचालक झिंगाट अवस्थेत होता. चालक मद्यप्राशन करून बस चालवत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आणि अनुचित घटना टळली. या चालकाला पुढील कारवाईसाठी अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
साकीनाका येथे ‘योगीराज श्रीकृष्ण’ नावाची एक शाळा आहे. या शाळेच्या मुलांसाठी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शाळेने गुप्ता ट्रॅव्हल्सची एक खासगी बस भाड्याने घेतली होती. मंगळवारी सकाळी शाळेत ही बस आली होती. त्यानंतर ५० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन बसचालक गोराईच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता. सकाळी साडेनऊ वाजता ही बस साकीनाकाहून जात असताना बसचालकाचे ड्रायव्हिंग धोकादायक वाटल्याने तिथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिसांचे अंमलदार पवार, महाले यांनी बसचालकाला थांबण्याचा इशारा केला. या चालकाची चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्याने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मद्यप्राशन केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याचा अधिकृत अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नसला तरी त्याने मद्यप्राशन केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
या घटनेनंतर बसचालकाविरुद्ध पोलिसांनी मद्यप्राशन करून शाळेच्या सहलीची बस चालवून शाळेतील विद्यार्थ्यासह शिक्षकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. बसचालकाने मद्यप्राशन केल्याचे समजताच शाळेतील शिक्षकांसह मुलांच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे बोलले जाते.