शिरीष पवार/मुंबई
मुंबईतीलच नाही, तर राज्य व देशभरातील गोरगरीब-मध्यमवर्गीय रुग्णांचा अखेरचा आधार असलेली महापालिकेची केईएम, शीव, कूपर, नायर आदी रुग्णालये आठवडाभर सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे जवळपास ठप्प झाली असून त्यामुळे खासगी रुग्णालयांना सुगीचे दिवस आले आहेत.
रुग्णसेवा क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक ‘नवशक्ति’ला सांगितले की, “महापालिका रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांना घरी सोडण्याचा वेग गेल्या तीन-चार दिवसांपासून अचानक प्रचंड वाढला आहे. पालिका रुग्णालयांतील नियमित रुग्णसेवेच्या तुलनेत सध्या होणारे काम हे जवळपास नगण्य आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील अनेक डॉक्टर हे बड्या रुग्णालयांच्या पॅनेलवर आहेत. निवासी डॉक्टरांचे आंदोलन हे अशा व्यापारी दृष्टिकोन बाळगणाऱ्या डॉक्टरांसाठी मोठी पर्वणीच ठरले आहे. हृदयरोग आदी गंभीर दुखण्यांच्या रुग्णांना संपाचे कारण सांगून थेट खासगी रुग्णालयांच्या दारात टोलविले जात आहे. मज्जासंस्थेचे विकार असलेल्या रुग्णांचेही हाल होत आहेत. उपचार तर दुरावलेच, पण खिशाला आग लागली, असा आक्रोश रुग्ण करीत आहेत.” गरजू रुग्णांना किफायतशीर दरात उपचार उपलब्ध करून देण्याच्या समाजोपयोगी कामात गुंतलेल्या एका आरोग्य कार्यकर्त्याने पालिका रुग्णालयांतील रुग्णसेवेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याची तक्रार केली.
महापालिकेच्या रुग्णालयांतून रुग्णांना घरी सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याची बाब मुंबई महापालिकेच्या रुग्णालय संचालक डॉ. नीलम अंद्रादे यांच्या लक्षात आणून दिली असता, त्यांनी ही बाब अमान्य केली. त्या म्हणाल्या की, “ज्या रुग्णांची स्थिती सुधारली आहे, त्यांना दाखल करून घेण्याची गरज नाही, त्यांनाच आम्ही घरी सोडले आहे. ज्यांना रुग्णालयात उपचारांची गरज आहे, त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत, अशी बाजू त्यांनी मांडली. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची तसेच नियमित शस्त्रक्रियांची संख्या कमालीची घटली असल्याची बाब मात्र त्यांनी मान्य केली. पालिका प्रशासन संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करीत असून लवकरच समाधानकारक तोडगा निघेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आकडे सत्य बोलतात...
मुंबई महापालिकेच्या एकट्या केईएम या रुग्णालयाचेच उदाहरण घेतले, तर मुंबईतील खालावलेल्या रुग्णसेवेचे गांभीर्य लक्षात येते. केईएम रुग्णालयात रोज सरासरी १८५ नवे रुग्ण दाखल होतात. सोमवार, १९ ऑगस्ट रोजी या रुग्णालयात केवळ ४० रुग्ण दाखल झाले. शीव-४७, नायर-२७, कूपर- ३३, नायर दंतमहाविद्यालय- एक अशी अन्य रुग्णालयांची आकडेवारी आहे. केईएममधील दैनंदिन सरासरी बाह्यरुग्णांची (नवे व जुने) संख्या ३९८१ आहे. प्रत्यक्षात सोमवारी असे १६१८ रुग्ण उपचार घेऊ शकले. शीव-१०१५, नायर-६७८, कूपर- १३२७ तर नायर दंतमहाविद्यालय- ५०७ अशी अन्य ठिकाणची बाह्यरुग्ण संख्या आहे. केईएममध्ये सोमवारी मोठ्या शस्त्रक्रिया १२, तर लहान ३८ झाल्या. पण शीव रुग्णालयात अशी एकही शस्त्रक्रिया झाली नाही. कूपरमध्ये मोठ्या चार, तर लहान नऊ शस्त्रक्रिया झाल्या. नायर दंतवैद्यकीयमध्ये केवळ लहान १४ शस्त्रक्रिया दिवसभरात झाल्या.
सामूहिक रजा आंदोलन लांबणीवर
पालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने निवासी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याने हे आंदोलन पंधरा दिवस लांबणीवर टाकल्याची माहिती या संघटनेचे सरचिटणीस डॉ. रवींद्र देवकर यांनी दिली.
पालिकेच्या रुग्णालयांत उपचारांची गरज असलेल्या कोणत्याही रुग्णाला घरी पाठविण्यात आलेले नाही. अत्यावश्यक सेवा आम्ही देतच आहोत. संपकरी डॉक्टरांच्या मागण्यांवर सातत्याने चर्चा सुरू आहे. आंतरनिवासित (इंटर्न) तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर परतू लागले आहेत. यापुढे स्थिती सुधारण्याची आशा आहे.
- डॉ. नीलम अंद्रादे, संचालिका, पालिका रुग्णालये