
मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अर्शद खान या व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच अर्शद हा पळून गेला होता. अखेर सात महिन्यांनंतर त्याला उत्तर प्रदेशातून विशेष पथकाने गजाआड केले.
१३ मे २०२४ रोजी घाटकोपर येथे अवकाळी पावसामुळे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले होते. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला, तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे आणि नंतर विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यात नंतर इगो मीडिया कंपनीचे संचालक भावेश भिडे, माजी संचालिका जान्हवी मराठे, सागर पाटील आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघूला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच गोवंडीतील व्यावसाकि अर्शद खान हा पळून गेला होता. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना अर्शद हा उत्तरप्रदेशात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने अर्शदला उत्तर प्रदेशातून अटक केली. २०२१-२२ साली इगो मिडीयाने दहा बँक खात्यात ३९ व्यवहारामध्ये ४६ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यातील काही रक्कम अर्शद खानच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यामुळे त्याला पोलिसाकडून चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. मात्र तो चौकशीसाठी हजर राहत नव्हता. त्यामुळे त्याला या गुन्ह्यात पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते.