मुंबई : मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून अंधेरीतील साची बारमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या छमछमचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी बारचा मालक, मॅनेजरसह ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत गायिका असलेल्या १८ बारबालांची सुटका करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या सर्वांना नंतर अंधेरी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. या कारवाईमुळे शहरातील बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंधेरीतील सहार रोडवरील सिगारेट फॅक्टरीसमोरील चकाला व्हिलेजमध्ये साची (रत्नमहल) नावाचे एक बार अँड रेस्टॉरंट आहे. या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बारबालांना ग्राहकांसमोर बॉलीवूड गाण्यांवर अश्लील नृत्य करण्यास प्रवृत्त केले जाते. मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री अचानक छापा टाकला, यावेळी तिथे असलेल्या ग्राहकांसमोरच काही बारबाला अश्लील नृत्य करताना दिसून आल्या.
या कारवाईत पोलिसांनी बारचा मालक, मॅनेजर, कॅशिअर, नऊ स्टीवर्ड-वेटर, चार ऑर्केस्ट्रा कलाकार आणि १५ ग्राहकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १८ बारबालांची सुटका केली. गायिका म्हणून काम करणाऱ्या या तरुणींना ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले.