

अनिलराज रोकडे/ वसई
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी (बविआ) समोर पक्षाची अखंडता टिकवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून बविआने विविध राजकीय पक्षांतील नेतेमंडळी आयात करून जिल्ह्यात राजकीय पकड मजबूत केली होती; मात्र गेल्या काही वर्षांत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये सैलता दिसून येत आहे.
दोन दशकांत बविआने खासदार, तीन आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळवले. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षांत माजी आमदार हीतेंद्र ठाकूर समर्थक सुदेश चौधरीने शिवसेनेत प्रवेश केला; नालासोपाऱ्यातील पंकज देशमुख आणि माजी नगरसेवक किशोर नाना पाटील यांनीही पक्ष सोडून शिवसेनेची साथ घेतली. (अलीकडेच पंकज देशमुख भाजपमध्ये प्रवेश केला.)
तसेच, माजी महापौर राजीव पाटील यांचे काही समर्थक पक्षाबाहेर गेले. गेल्या दोन महिन्यात नवघर-माणिकपूर विभागातून माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, प्रदीप पवार आणि कार्यकर्ता संतोष घाग यांनी पक्ष सोडून कमळाची निवड केली. विरारमधून माजी नगरसेवक महेश पाटील आणि नायगाव-वडवली भागातून नितीन ठाकूर यांनीही भाजपात प्रवेश केला.