
मुंबई : शहरातील भायखळा आणि बोरिवलीतील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असला तरी परिसरातील बांधकामांवरील बंदी तूर्त कायम राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या समीर अपनुसार, मात्र कुलाब्यातील नेव्हीनगर आणि गोवंडीतील शिवाजीनगर येथील हवेचा दर्जा खराब असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी येथील निरीक्षणानंतर दोन्ही परिसरात बांधकाम बंद करण्याचे पाऊल पालिकेतर्फे उचलले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या दोन महिन्यापासून खालावली आहे. मात्र पालिकेने आखून दिलेल्या उपाययोजनाची कठोरपणे अंबालबाजवणी होत असल्याने हवेचा दर्जा काही अंशी सुधारत असल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. भायखळा व बोरिवलीतील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० वर गेला होता. मात्र दोन दिवसांपासून हवेचा दर्जा समाधानकारक (१२५ ते १४० दरम्यान) आहे. असे असले तरी प्रदूषणात सुधारणा होईपर्यंत येथील बांधकामे बंदच राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
गोवंडी येथील शिवाजीनगर व कुलाब्यातील नेव्ही नगर येथील हवेचा निर्देशांक चिंताजनक (२०० हून अधिक) आहे. पुढील काही दिवस परिसरावर पालिकेचे लक्ष राहिल. हवेचा दर्जा सुधारला नाही तर येथेही बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयुक्त गगराणी यांनी दिली. प्रदूषणाबाबतची शुक्रवारच्या आढावा बैठकीनंतर गगराणी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते.
शिवाजीनगर, गोवंडी येथे शुक्रवारीही सायंकाळी हवे ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक २१२ होता. त्याचबरोबर नेव्हीनगर येथेही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथे २६० निर्देशांक नोंदला गेला. गोवंडीच्या शिवाजीनगरमधील हवा अनेकदा `वाईट` श्रेणीत नोंदली गेली आहे. तेथे पीएम २.५ धुलीकणांची मात्रा ही अधिक प्रमाणात होती.
मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून वायू प्रदूषणाने नीचांक गाठला आहे. भायखळा व बोरिवलीबरोबरच इतर ठिकाणीही हवेचा दर्जा खालावला होता. पालिकेने तात्काळ निर्णय घेऊन प्रदूषणकारी बांधकामांच्या ठिकाणी बांधकाम बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भायखळा व बोरिवलीतील ८० हून अधिक बांधकामांचा समावेश आहे
कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पाला नोटीस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सागरी रस्ते प्रकल्प आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना वांद्रे-कुर्ला संकुलातील मेट्रो प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचे पालन न केल्याबद्दल नोटिसा दिल्या आहेत. तसेच आयआयटीएम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच्या मापन केंद्रांमध्ये विसंगती आढळल्यामुळे नेव्ही नगर आणि परिसरात मोबाईल मॉनिटरिंग व्हॅन तैनात करण्यात आली आहे. कुलाब्यातील हवेच्या गुणवत्तेचे मापन केंद्र पुन्हा कॅलिब्रेट करण्यासाठी आयआयटीएमला नोटीस देण्यात आली आहे.