

मेघा कुचिक / मुंबई
भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या स्वच्छतागृहात महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गुरुवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीला येतात रेल्वे पोलिसांनी तिला उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले.
भायखळा स्थानकात फलाट क्रमांक एकवर दुपारी ३ वाजता ही घटना घडली. विद्यार्थिनी बराच वेळ स्वच्छतागृहातील टॉयलेटमधून बाहेर येत नव्हती. वारंवार दरवाजा वाजवल्यानंतरही तो उघडला गेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी आत तरुणी बेशुद्ध असल्याचे आढळले. मुलीने धारधार वस्तूने हाताला इजा केली होती. तिला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात आपत्कालीन उपचारांसाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मुलीची प्रकृती स्थिर
ही विद्यार्थिनी नैराश्याने त्रस्त होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. भायखळा येथील रहिवासी आहे. कोणतीही औपचारिक तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवलेला नाही. दरम्यान, विद्यार्थिनीची प्रकृती सुधारल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.