मुंबई : कांदिवलीतील एका सीएची फ्लॅटसाठी फसवणूक केल्याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हिमेश हर्षदराय देसाई आणि निगोध हिम्मतलाल शाह अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही आदित्य बिल्डर कंपनीचे पार्टनर असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवली येथे तक्रारदार राहत असून, ते सीए आहेत. पाच वर्षापूर्वी त्यांनी आदित्य बिल्डर कंपनीचे हितेश देसाई आणि निगोध शाह यांच्या बोरिवलीतील टीपीएस रोडवरील विलास वैभव सोसायटीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता.
बाराव्या मजल्यावरील ९४१ चौ. फुटाच्या फ्लॅटसाठी त्यांन या दोघांनाही ऑगस्ट २०१८ रोजी एक कोटी दहा लाख रुपये दिले होते. संपूर्ण पेमेंट मिळाल्यांनतर त्यांच्यात एक कायदेशीर करार झाला होता. तसेच फ्लॅटचे बोरिवलीतील रजिस्ट्रेशन कार्यालयात रितसर रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्यूटीची प्रोसेसिंग पूर्ण करण्यात आली होती. या करारात त्यांना सप्टेंबर २०२० रोजी फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र जुलै २०२३ पर्यंत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर या दोघांनीही त्यांना फ्लॅट देणार नाही, तसेच पुन्हा विचारणा करण्यासाठी येऊ नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. अशा प्रकारे हितेश देसाई आणि निगोध शाह यांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटी दहा लाखांचा अपहार करून फ्लॅटचा ताबा न देता त्यांची फसवणूक केली होती.