
अखेर ओशिवरा-जोगेश्वरी पूर्व उड्डाणपुलाचा विस्तार करण्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल. या पुलाच्या विस्तारीकरणाला तीन वर्षे लागणार असून जोगेश्वरी येथील पूनम नगर-जेव्हीएलआर ते अंधेरीचा लिंक रोड याद्वारे जोडला जाईल.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने अंदाजे यासाठी ३४६.१६ कोटी रुपये खर्चून गहाळ दुवे बांधण्यासाठी तयारीची कामे सुरू केली आहेत. जोगेश्वरी पूर्व येथे ६२० मीटर, तर ओशिवराच्या दिशेने सुमारे ५५० मीटर रॅम्प आणि रोड यासाठी बांधणे आवश्यक आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे येथेही केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येणार असून हा ब्रिज पश्चिम द्रुतगती महामार्गाला (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) ओलांडणार आहे.
२०१५मध्ये जोगेश्वरी-ओशिवरा आणि जेव्हीएलआर हा भाग जोडण्यासाठी या फ्लायओव्हरच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला. परंतु त्यानंतर दहिसर-अंधेरी मेट्रोमुळे या पुलाचे काम रखडले. अखेर आता पुन्हा या ब्रिजचे काम हाती घेण्यात येणार आहे.
केबल स्टेड ब्रिजमुळे जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोड ते ओशिवरा किंवा महामार्गापर्यंत जाण्यासाठी अवघ्या १० मिनिटांचा अवधी लागेल.