मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

तुला नग्न करून पोलीस जीपमध्ये घालून रेस्टॉरंटला नेईन, असा दम तोतया अधिकाऱ्यांनी नरेश यांना दिली.
कॅफे म्हैसूरच्या मालकाला लुटलं
कॅफे म्हैसूरच्या मालकाला लुटलंFPJ Navshakti

मुंबई: पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरात घूसून २५ लाखांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी मुंबईत घडली. मुंबईत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानं सर्वत्र खळबळ माजली आहे.

नरेश नागेश नायक (44) असे पीडित व्यक्तीचे नाव असून ते माटुंगा (पूर्व) येथील माहेश्वरी उद्यानासमोर लोकप्रिय कॅफे म्हैसूर रेस्टॉरंट चालवतात. हे रेस्टॉरंट मुंबईतील सर्वात जुन्या उडिपी रेस्टॉरंटपैंकी एक आहे. नरेश नायक सायन रुग्णालयासमोरील अलंकार बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. सोमवारी ते घरी एकटेच असताना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास कोणीतरी दारावरची बेल वाजवली.

गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत दरोडा....

दरवाजा उघडताच काही वेळातच साध्या वेशातील सहा जण त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत त्यांनी आपली ओळखपत्र नरेश यांना दाखवली. तुमच्या फ्लॅटमध्ये १७ कोटी रुपयांचा काळा पैसा ठेवला असून तो लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे, अशी आम्हाला माहिती मिळाल्याचं संबंधित व्यक्तिंनी नरेश यांना सांगितलं. नरेश यांनी आपल्याकडे एवढी मोठी रक्कम असल्याचे नाकारले.

तुला नग्न करून रेस्टॉरंटला नेईन...

'तुला नग्न करून इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या पोलिस जीपमध्ये घालीन आणि रेस्टॉरंटला नेईन,' अशी अशी धमकी संबंधितांनी नरेश यांना दिली आणि फ्लॅटवर छापा टाकला. आपल्याकडे फक्त २५ लाख रुपये असून ही रक्कम रेस्टॉरंटची कमाई असल्याचं नरेश यांनी सांगितलं. आपल्याला रेस्टॉरंटमधून दररोज सुमारे 1 ते 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम ते दररोज फ्लॅटवर आणतात आणि आठवड्याच्या शेवटी बँकेत जमा करतात. हे रेस्टॉरंट त्याची आई शांतेरी (75) यांच्या मालकीचे असून ती सध्या बंगळुरूमध्ये आपल्या बहिणीकडे आहे, असंही नरेश यांनी त्यांना सांगितलं.

दोन कोटी रूपये देत असशील तर ते मांडवली करू...

परंतु त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सर्व कपाटे उघडून २५ लाख रुपये काढून घेतले आणि नरेश यांना सांगितले की, जर ते दोन कोटी रूपये देत असतील तर ते मांडवली करून केस बंद करण्यास तयार आहेत. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, असं नरेश यांनी त्यांना सांगितल्यावर ही घटना कोणाला सांगू नकोस, अशी धमकी देऊन तोतया अधिकाऱ्यांनी फ्लॅट सोडला. तेथून निघताना त्यांनी नरेश यांचा हिसकावून घेतलेला मोबाईल फोन परत केला.

पोलिसांची तातडीनं कारवाई:

त्यानंतर नरेश यांनी सायन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परिमंडळ 4 चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी पोलिसांची अनेक पथके तयार केली, सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि गुन्ह्यात वापरलेली पोलिस जीप तातडीनं शोधून काढली.

गुन्ह्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश-

एक पोलिस कर्मचारी, एक निवृत्त पोलिस, एक खबरी आणि इतर दोघांसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग असून गुन्ह्याच्या अंमलबजावणीत पोलिसांच्या जीपचा वापर करण्यात आला आहे. सदर घटना धक्कादायक असून तपास सुरु असल्याचं पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितलं. जयस्वाल नावाचा एक व्यक्ती या गुन्ह्याचा सुत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान नरेश यांच्या फ्लॅटमध्ये असलेल्या रोख रकमेची माहिती दरोडेखोरांना कोणी दिली हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. या संदर्भात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in