

मुंबई : समाजात विवाहानंतरही अनेक दाम्पत्यांना मुले होत नाहीत. त्यामुळे अनेक जण दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च करून 'आयव्हीएफ' तंत्रज्ञानाने मूल जन्माला घालण्याचा मार्ग निवडतात. गरीबांना हे तंत्रज्ञान परवडत नाही. त्यामुळे मोठ्या हालअपेष्टांना त्यांना तोंड द्यावे लागते. आता मुंबईतील कामा अँड अब्लेस या शासकीय रुग्णालयाने 'आयव्हीएफ/एआरटी' प्रयोगशाळेत भ्रूणनिर्मिती करण्यात यश मिळवले आहे. हा प्रयोग करणारे ते पहिलेच शासकीय रुग्णालय ठरले आहे. विशेष म्हणजे हे उपचार मोफत होणार आहेत, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
राज्याच्या दुर्गम भागातून आलेल्या, गेल्या दहा वर्षांपासून अपत्यप्राप्ती न झालेल्या एका दाम्पत्यावर अत्यल्प खर्चात उपचार करण्यात आले. त्यामुळे या दाम्पत्याच्या जीवनात आशेचा किरण उगवला आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात 'आयव्हीएफ'चा खर्च मोफत आहे. औषध व गोळ्या व चाचण्यांचा खर्च रुग्णांना करावा लागेल. या 'आयव्हीएफ' केंद्रामुळे अपत्यप्राप्तीसाठी संघर्ष करणाऱ्या अनेक दाम्पत्यांना नवी आशा मिळाली आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये या रुग्णालयाला 'असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) बँक' स्थापन करण्यास अधिकृत मान्यता मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातील हे पहिले शासकीय 'एआरटी' बँक असलेले रुग्णालय ठरले आहे. या निर्णयामुळे महागड्या खासगी 'आयव्हीएफ' केंद्रांचा खर्च परवडत नसलेल्या हजारो निपुत्रिक दाम्पत्यांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध होणार आहेत.
कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे म्हणाले, "आमच्या आयव्हीएफ/एआरटी प्रयोगशाळेत 'पेट्री डिश' मध्ये पहिल्या भ्रूणाची निर्मिती हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अपत्यप्राप्तीसाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या अनेक दाम्पत्यांसाठी हा आशेचे किरण आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी 'आयव्हीएफ' उपचारांचा प्रचंड खर्च पालकत्वाचे स्वप्न अशक्य करून टाकतो. श्रीमंत दाम्पत्ये खासगी रुग्णालयांकडे वळतात, मात्र अल्प उत्पन्न गटातील दाम्पत्ये या सुविधांपासून वंचित राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने ६ मार्च २०२४ रोजी कामा रुग्णालयात 'आयव्हीएफ' केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यानंतर शुक्राणू व अंडाणू जतन करण्यासाठी 'एआरटी' बँकेच्या परवान्यासाठी अर्ज करण्यात आला.
'एआरटी' बँकेची मान्यता मिळाल्यानंतर आता रुग्णालयात 'एआरटी-२' प्रक्रिया करता येणार आहेत. 'आयव्हीएफ, आयसीएसआय' आणि इतर वंध्यत्व उपचारांसाठी येणाऱ्या दाम्पत्यांना दान केलेले शुक्राणू, दान केलेली अंडाणू तसेच क्रायोप्रिझव्र्हेशन (गोठवून साठवण) सुविधा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमार्फत अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होतील," असे डॉ. पालवे यांनी सांगितले.
'एआरटी' उपचार दोन प्रमुख टप्प्यांत केले जातात. पहिल्या टप्यात महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाते. अंडाशयाशी संबंधित आजार, फायब्रॉइड्स, गर्भाशय किंवा फलोपियन ट्यूबमधील अडथळे यांवर शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करून अनेक प्रकरणांत नैसर्गिक गर्भधारणा शक्य होते. हे प्रयत्न अपयशी ठरल्यास 'आयव्हीएफ' प्रक्रियेला सुरुवात केली जाते. या प्रक्रियेत अंडाणू व शुक्राणू गोळा करून प्रयोगशाळेत त्यांचे फलन केले जाते आणि तयार झालेला भ्रूण महिलेच्या गर्भाशयात स्थानांतरित केला जातो. या पद्धतीने जन्मलेल्या बाळांना सामान्यतः 'टेस्ट ट्यूब बेबी' असे संबोधले जाते.
'एआरटी' बँकेमार्फत शुक्राणू, अंडाणू आणि भ्रूणांचे संकलन, प्रक्रिया, सुरक्षित साठवण आणि वितरण अशा सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्यामुळे प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा लाभ अधिक व्यापक लोकसंख्येपर्यंत पोहोचणार आहे.
पालकत्वाची संधी सुरक्षित ठेवता येणार
ही 'एआरटी' बँक कर्करोग रुग्णांसह गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांनाही लाभदायक ठरणार असून, उपचारांपूर्वी किंवा उपचारादरम्यान प्रजननक्षमता जतन करून बरे झाल्यानंतर पालकत्वाची संधी सुरक्षित ठेवता येणार आहे.