प्रतिनिधी/मुंबई: आपल्या अहंकारापायी ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकले, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी व खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले. निवडणुका एकाबरोबर जिंकल्या आणि सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेले. म्हणून राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही ते सरकार उलथवून लावून जनतेचे सरकार स्थापन केले. आज ते आमचा विरोध करतात, आम्हाला रावण म्हणतात. राम कोण आणि रावण कोण हे सर्व जनतेला ठाऊक आहे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला, त्यांना रामाबद्दल बोलण्याचा काहीएक अधिकार नाही. जो राम का नही, वह किसी काम का नही. जी अवस्था अहंकारी रावणाची झाली, तीच अवस्था यांची होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
बाळासाहेब भवन येथे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या विचारांना अभिप्रेत सरकार आम्ही स्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असायचे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजातील सर्व घटकांना, महिला, शेतकरी, युवावर्ग, आबालवृद्धांना न्याय देण्याचे काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांगीण विकासाला आणि स्वच्छता व आरोग्याला प्राधान्य द्यायचे म्हणून त्यांच्या नावाने आपण 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग' सुरू केला. 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू केला. 'शासन आपल्या दारी' हा लोकाभिमुख कार्यक्रम सुरू केला. ज्याचा लाभ आतापर्यंत २ कोटी २० लाख जनतेने घेतला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास आले. मुख्य म्हणजे त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राम मंदिराचे लोकार्पण झाले, ही बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरली. बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येक शिवसैनिकासाठी आनंदाचा क्षण. म्हणून आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेतर्फे ११ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
मराठा समाजाने संयम बाळगावा
मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आणि सकारात्मक आहे. ओबीसी समाज व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. ही सरकारची जबाबदारी आहे. संपूर्ण मागासवर्ग आयोग त्यासाठी २४ तास तीन शिफ्टमध्ये त्यासाठी काम करत आहे. दीड लाख लोक त्यासाठी काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट त्यासाठी काम करत आहेत. हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा सरकार करणार आहे.