महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये कॅमेरे; मध्य रेल्वेच्या लेडीज कोचमध्ये टॉकबॅक सिस्टीम

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ७२९ उपनगरीय ईएमयू कोचमध्ये ४४३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर १३५ ईएमयु रेकच्या लेडीज कोचमध्ये टॉकबॅक सिस्टीम बसवण्यात आली आहे
महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये कॅमेरे; मध्य रेल्वेच्या लेडीज कोचमध्ये टॉकबॅक सिस्टीम
Published on

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ७२९ उपनगरीय ईएमयू कोचमध्ये ४४३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर १३५ ईएमयु रेकच्या लेडीज कोचमध्ये टॉकबॅक सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात विविध स्थानकांमध्ये २८ एस्केलेटर आणि ३३ लिफ्ट बसवण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मध्य रेल्वेच्या १२५व्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी प्रवाशांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राम करन यादव म्हणाले की, मध्य रेल्वे दररोज सरासरी ३७४ मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि १४५ पॅसेंजर/मेमू/डेमू गाड्या चालवते. यामधून दररोज सरासरी ५.२ लाख प्रवासी प्रवास करतात. अलीकडेच मध्य रेल्वेने कलबुर्गी ते बंगळुरू दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. ज्यामुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एकूण वंदे भारत ट्रेनची संख्या ७ झाली आहे.

ते पुढे म्हणाले की, मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ३०८ विशेष गाड्या चालवल्या आहेत. श्रीगणेश उत्सवासाठी २५८ विशेष गाड्या चालवण्याची आमची योजना आहे. याशिवाय नवरात्री, दीपावली, छट आदी सणांसाठी आणखी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

शहरातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे दररोज १८१० उपनगरीय सेवा देखील चालवते. यामध्ये ६६ वातानुकूलित उपनगरीय लोकल ट्रेन आहेत. ते पुढे म्हणाले की, अलीकडेच बेलापूर-उरण मार्गावर खारकोपर ते उरणपर्यंत उपनगरीय सेवा विस्तारित करण्यात आली आहे.

३ नवीन कोचिंग टर्मिनल्सची योजना प्रगतीपथावर

मुंबई विभागात पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स, परळ कोचिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड मेगा-टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचा विस्तार, नागपूर विभागातील गोधनी येथे, पुणे विभागातील उरुळी, भुसावळ विभागातील ओढा, नाशिक येथे आणि सोलापूर विभागातील टिकेकरवाडी येथे कोचिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई विभागातील कल्याण, नागपूर विभागातील अजनी आणि पुणे विभागातील हडपसर येथे ३ नवीन कोचिंग टर्मिनल्सची योजना देखील प्रगतीपथावर आहे.

logo
marathi.freepressjournal.in