मुंबई : ताडदेव येथील विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमधील ५० आजीवन सदस्यत्व आणि सनदी अधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाचा निर्णय रद्द करा. महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या धर्तीवर हा निर्णय घ्यावा, अशी मागणी कुलाबा येथील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
राज्याच्या नगरविकास विभागाने विलिंग्डन क्लबमध्ये ५० आजीवन सदस्य मोफत नामनिर्देशित करण्याबाबत १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. हा निर्णय केवळ शेड्यूल (डब्ल्यू) मालमत्तांना लागू आहे. याचप्रकारचा निर्णय आधी सरकारने आरडब्ल्यूआयटीसीसाठीही घेतला होता. नंतर त्यात नोकरशहांची आजीवन सदस्यत्वाची तरतूद काढून टाकून सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबच्या निर्णयातही ताबडतोब सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा, शहरातील इतर क्लब आणि जिमखान्यांसाठी हा पायंडा पडेल, अशी भीती नागरिकांना वाटते, असे नार्वेकर म्हणाले.
विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब हा शतकाहून अधिक जुना क्लब असून शहरातील क्रीडा संस्कृतीच्या वाढीसाठी त्याचे मोठे योगदान आहे. या क्लबमध्ये आजीवन सदस्यांना नामनिर्देशित केल्यास क्लबचा सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध इतिहासाला बाधा येईल. विलिंग्डन क्लबच्या बाबतीत भाडेकरार नूतनीकरणाचा असा कोणताही निर्णय झालेला नाही तर अचानक विलिंग्डन क्लबला मोफत आजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय कसा घेण्यात आला? असा सवाल ॲॅड. नार्वेकर यांना केला आहे.