ललित कला प्रतिष्ठानला दिलेले कंत्राट रद्द करा! डॉ. भारती लव्हेकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे
ललित कला प्रतिष्ठानला दिलेले कंत्राट रद्द करा! डॉ. भारती लव्हेकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

सर्वसामान्य घरातील मुलांना खेळाचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यात आला. मात्र आता या ठिकाणी लग्न समारंभ, इव्हेंट्स व शूटिंग होत असून यातून मिळणाऱ्या पैशांचा हिशेब नाही. त्यामुळे या स्पोर्ट्स क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी पत्राद्वारे दिली आहे. दरम्यान, मेसर्स ललित कला प्रतिष्ठानला दिलेले कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, असे लव्हेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांची मुले येथे घडतील, खेळाडू बनतील यासाठी मुलुंड आणि अंधेरी (वर्सोवा विधानसभा) याठिकाणी शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) उभारण्यात आले. परंतु या सगळ्याला संकुल भाडे तत्वावर चालवणारी कंत्राटदार कंपनी मेसर्स ललित कला प्रतिष्ठानने हरताळ फासला आहे. या क्रीडा संकुलात मल्टिप्लेक्स स्टेडियम होते. क्रिकेट, हँडबॉल, वॉलीबॉल, कबड्डी इतर मैदानी खेळ खेळल्या जात होते. आता फक्त फुटबॉल खेळ आहे आणि फक्त फुटबॉल साठी क्रिकेट, हँडबॉल, वॉलीबॉल, कबड्डी हे खेळ जाणून बुजून बंद करण्यात आले आहेत. आता फक्त मोठे मोठे लग्न समारंभ, कार्यक्रम, एका राजकीय पक्षाचा कारभार चालतो, डेकोरेटर चा विळखा, त्या माध्यमातून पैशाची कमाई केली जाते. बाहेरून येणाऱ्या खेळाडूंकरिता निवासासाठी ५६ रुमचे खेळाडू वसतिगृह बनवण्यात आले होते. आता त्याचे थ्री स्टार हॉटेल बनवण्यात आले असून त्या ठिकाणी ऑनलाइन बुकिंग व्यवस्थाची करण्यात आली आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांना पगार नाही!

शहाजी राजे संकुल चालवणाऱ्या ललित कला प्रतिष्ठान बरोबर मुंबई महापालिकेने केलेला कंत्राट २०२० मध्ये संपुष्टात आला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या संकुलात सभासदांना सुविधा मिळत नाही. मुंबई महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे. दरम्यान, लव्हेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in