गोरगरीब गरजू रुग्णांना दिलासा: वांद्रे पश्चिम येथे कॅन्सर रुग्णालय उभे राहणार; १६५ खाटा, ९ मजली, रेडिएशन, केमोथेरपी

गोरगरीब गरजू रुग्णांना दिलासा: वांद्रे पश्चिम येथे कॅन्सर रुग्णालय उभे राहणार; १६५ खाटा, ९ मजली, रेडिएशन, केमोथेरपी

कॅन्सर रुग्णांची संध्या वाढत असून, सध्या मुंबईत कॅन्सर सेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो.
Published on

मुंबई : १६५ खाटा, रेडिएशन केमोथेरपी, अतिदक्षता विभाग सुसज्ज असे कॅन्सर रुग्णालय लवकरच वांद्रे पश्चिम येथे उभारण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे कर्करोग रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कॅन्सर रुग्णांची संध्या वाढत असून, सध्या मुंबईत कॅन्सर सेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो. मुंबई सेंट्रल जवळील नायर रुग्णालय हे रेडिएशन थेरपी देणारे एकमेव नागरी केंद्र आहे. त्यामुळे वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोर असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असावे, अशी कल्पना स्थानिक आमदार व मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेकडे मांडली होती. पालिकेने ही मागणी मान्य केली असून याबाबत दोन बैठकाही आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत झाल्या. त्यानुसार वांद्रे कर्करोग रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा पालिकेने तयार केल्याचे शेलार यांनी सांगितले. केमोथेरपीपासून ब्रॅकीथेरपी आणि रेडिएशनपर्यंत, अतिदक्षता विभागासह संपूर्ण कर्करोगाची काळजी घेणारे हे अद्यावत रुग्णालय असणार आहे. पालिकेच्या वास्तुविशारद शाखेने तयार केलेला प्राथमिक आराखडा पालिकेच्या इमारत देखभाल विभागाच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाकडे सादर करण्यात आला आहे. भाभा हॉ‍स्पिटलसमोरील जमीन २,५२५ चौरस मीटरचा भूखंड सध्या नगरपालिका सुविधांसाठी राखीव आहे त्यावर हे ग्राऊंड प्लस-नऊ मजली इमारतीचे रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे.

असे असेल रुग्णालय!

सुमारे १२ हजार स्क्वेअर मीटरच्या बिल्ट-अप क्षेत्रासह दोन तळघर असतील. रेडिएशन थेरपीसाठी दोन बंकर खोल्या असलेल्या या इमारतीत १२ ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यासह पाच प्रयोगशाळा असणार आहेत. डायग्नोस्टिकमध्ये, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्स देखील असतील. रुग्णालयाच्या इमारतीत लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन असेल. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी वसतिगृह अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in