
मुंबई : कृषी विभागाच्या सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपीक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेदरम्यान हायटेक कॉपी पद्धतीचा वापर करून कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला पवई पोलिसांनी अटक केली. रामकिशन दत्तू बेडके असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा औरंगाबादचा रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिपक सुरेंद्र कुठे हे ठाण्यातील कृषी विभागात जिल्हा अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभागाच्या ठाणे कृषी विभागातर्फे २१ सप्टेंबर, २२ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबरला सहाय्यक अधिक्षक आणि वरिष्ठ लिपीक पदासाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. ही परिक्षा सुरळीत पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता पवईतील मोरारजीनगर, टीसीएस आयऑन डिजीटल झोनमध्ये काही विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा सुरू होती. ८२८ उमेदवारापैकी ४९३ उमेदवार परिक्षा देत असताना एका वर्गात पर्यवेक्षकांना फोनवर बोलण्याचा आवाज आला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित उमेदवाराकडे चौकशी केली असता तो प्रचंड घाबरून व गोंधळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांच्या समक्ष दुसऱ्या रुममध्ये आणून त्याची झडती घेण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडे या अधिकाऱ्यांना एक मोबाईल सापडला. या मोबाईलवरून तो कॉपी करून ऑनलाईन पेपर सोडविण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार लक्षात येताच त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.