कॅप्टन विनायक गोरे पूल म्युरल्सच्या सौंदर्याने नटला

कॅप्टन विनायक गोरे पूल म्युरल्सच्या सौंदर्याने नटला

मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेतर्फे ऑक्टोबर २०२२पासून मुंबई सुशोभीकरणाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे
Published on

मुंबई : उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत रंगीबेरंगी आकर्षक देखावे, भिंत चित्र मुंबईकरांचे आकर्षण ठरत आहे. विलेपार्ले पूर्वेकडील कॅप्टन विनायक गोरे पुलाखाली तसेच ना. सी. फडके मार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाखाली मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वरवर हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ, विठुमाऊलीसोबतचा संतमेळा, जैन ज्ञाती बांधवांचे पवित्रस्थान पालिताना येथील तीर्थक्षेत्र यांचे म्युरल्स उभारण्यात आले आहेत.

मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेतर्फे ऑक्टोबर २०२२पासून मुंबई सुशोभीकरणाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात मोकळ्या जागा, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, रस्ते, पादचारी पूल, उड्डाणपूल, स्कायवॉक, समुद्रकिनारे, उद्याने, पर्यटनस्थळे या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, झाडांची लागवड आणि आकर्षक प्रकाशयोजना आदींचा समावेश असणारी १७ विविध प्रकारची कामे केली जात आहेत. ही कामे करताना कलात्मक गोष्टींसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करून घेण्यात आला आहे. या अंतर्गत विलेपार्ले प्रभाग ८४, पार्ले-जी कंपनीसमोरील कॅप्टन विनायक गोरे पुलाखाली तसेच ना. सी. फडके मार्गावरील पुलाखाली आकर्षक म्युरल्स उभारून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

कॅप्टन गोरे उड्डाणपुलांखालील जागा विनावापर आणि सुस्थितीत नव्हती. या जागेच्या सुशोभीकरणाकरीता नियोजन खात्याचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी त्वरित प्रतिसाद देऊन या प्रकल्पाकरिता निधी मंजूर केला. छत्रपती शिवाजी महाराज, विठू माऊली भक्तीरसात न्हालेला संत मेळा तसेच पालिताना येथील तीर्थक्षेत्र व जैन धर्मियांना पवित्र असलेली १४ स्वप्न यांचे म्युरल करण्याचे ठरले. जैन धर्मियांची म्युरल्स उभारण्याकरता धार्मिक व सांस्कृतिक बाबतीत माहिती स्थानिक चिंतामणी जैन देरासरच्या विश्वस्तांकडून मिळाली. आम्ही तयार केलेल्या डिझाईनमध्ये काही योग्य सूचनाही त्यांनी केल्या. हे म्युरल्स उभारण्याकरता समित शिवगण या मूर्तिकाराची अथक मेहनत मोलाची ठरली, आहे, अशी माहिती या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी दिली. स्वच्छता मोहिमेनिमित्त पार्ल्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला आवर्जून भेट दिली.

प्रतिक्रिया

योगा केंद्र, अँम्फी थिएटर, नर्सरी

ना. सी. फडके मार्ग येथील उड्डाणपुलाखालील ३२ हजार चौरस फूट जागेत योगा केंद्र, अँम्फी थिएटर, नर्सरी, मुलांना खेळण्याची साधने, अभ्यासिका, जॉगिंग ट्रॅक अशा प्रकारच्या सुविधांनी सज्ज प्रकल्पाची लवकरच उभारणी करण्याचा प्रकल्प सहआयुक्त रणजीत ढाकणे व सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्यासोबत चर्चा करून तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रशासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यास या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in