२२ लाखांच्या कपड्यासह गाडी पळविणार्‍या कारचालकाला अटक

गुजरातच्या सुरत शहरात पंधरा लाख रुपयांचे कपडे डिलीव्हरीची एक ऑर्डर मिळाली होती
२२ लाखांच्या कपड्यासह गाडी पळविणार्‍या कारचालकाला अटक
Published on

मुंबई : सुमारे २२ लाख रुपयांच्या कपड्यासह गाडी पळविणार्‍या कारचाकलास गोरेगाव पोलिसांनी अटक केली. राजू बच्चूलाल यादव असे या कारचालकाचे नाव असून त्याच्याकडून सात लाखांची गाडीसह पंधरा लाखांचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. दिनेश नंदू यादव हा गोरेगाव येथे राहत असून चालक म्हणून काम करतो. त्याची मालकीची एक आशयर कंपनीची गाडी असून गाडीचा वापर तो त्याच्या भावासोबत लोखंडी मालासह इतर साहित्य डिलीव्हरीसाठी करतो. त्याचा रतन यादव हा मित्र असून त्याच्याकडे राजू हा कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना गुजरातच्या सुरत शहरात पंधरा लाख रुपयांचे कपडे डिलीव्हरीची एक ऑर्डर मिळाली होती. त्याच्यासह त्याच्या भावाला सुरतला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी रतनला विनंती करुन तो माल सुरत पाठविण्यासाठी राजू यादवला पाठविण्यास सांगितले होते. रतनच्या कॉलनंतर राजू सुरतला जाण्यासाठी तयार झाला होता. ठरल्याप्रमाणे १९ जुलैला राजू हा पंधरा लाखांचे कपडे आणि सात लाखाची आशयर कंपनीची गाडी घेऊन सुरतला जाण्यासाठी निघाला. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा मुंबईत येणार होता. मात्र दोन ते तीन दिवस उलटूनही तो मुंबईत आला नाही. वारंवार कॉल करुनही तो कॉल घेत नव्हता. त्यामुळे त्याने सुरतला कपड्याची डिलीव्हरी असलेल्या मुन्ना शेटला कॉल केला असता त्याने त्यांचा माणूस कपडे घेऊन आलाच नाही असे सांगितले. राजू हा कपड्यासह गाडी घेऊन पळून गेल्याची खात्री होताच दिनेश यादवने गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राजू यादवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कपड्यासह गाडीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राजू यादवला पोलिसांनी अपहार केलेल्या गाडीसह कपड्यासह अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in