कारची डिव्हायडरला धडक दोघांचा मृत्यू ; तीनजण जखमी

नागरिकांनी व इतर टॅक्सी चालक आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
कारची डिव्हायडरला धडक दोघांचा मृत्यू ; तीनजण जखमी

मुंबई : सायन येथून दादरला जाणाऱ्या कारने सोमवारी पहाटेच्या सुमारास माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हॉटेल गंगा विहार समोरील डिव्हायडरला धडक दिली. यात कारमधील पाच जण जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघा जखमींवर उपचार सुरु असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रेम वाघेला (१८) आणि अजय वाघेला (२०) अशी दोघा मृतांची नावे आहेत. तर, हर्ष कदम (२०), रितेश भोईर (२५) आणि कुणाल अत्तर (३३) अशी तिघा जखमींची नावे असून ते सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत

सोमवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सायनवरुन दादरच्या दिशेने सीएनजी कार जात होती. तेव्हा या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारच्या इंधन मधून गळती झाली आणि कारने पेट घेतला.

कारच्या धडकेचा मोठा आवाज झाल्याने त्यावेळी त्या हॉटेल परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी व इतर टॅक्सी चालक आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात कारमध्ये बसलेले पाच जण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तिघांना बाहेर काढून सायन रुग्णालयात दाखल केले. तर अपघाताची व कारला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व उर्वरित दोघा गंभीर जखमींना कारमधून काढून तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले..

logo
marathi.freepressjournal.in