तृतीयपंथी, गतिमंद मुलांनी साकारली पुठ्ठ्याची गणेशमूर्ती! जिद्द व चिकाटी असेल तर काहीही शक्य

आकर्षक सजावट, विविध देखावे आणि बाप्पाच्या सुबक गणेशमूर्ती नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, अंधेरी, मरोळ येथील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात एक आगळीवेगळी गणेशमूर्ती तृतीयपंथी व गतिमंद मुलांनी साकारली आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून पुठ्ठ्यांचा वापर करून बनवण्यात आली आहे.
तृतीयपंथी, गतिमंद मुलांनी साकारली पुठ्ठ्याची गणेशमूर्ती! जिद्द व चिकाटी असेल तर काहीही शक्य
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

आकर्षक सजावट, विविध देखावे आणि बाप्पाच्या सुबक गणेशमूर्ती नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, अंधेरी, मरोळ येथील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात एक आगळीवेगळी गणेशमूर्ती तृतीयपंथी व गतिमंद मुलांनी साकारली आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून पुठ्ठ्यांचा वापर करून बनवण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी ती आकर्षण ठरत आहे. जिद्द व चिकाटी असेल तर आयुष्यात काहीही शक्य आहे, असा संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न तृतीयपंथी, गतिमंद मुलांनी केला आहे.

देशभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईतील गणेशोत्सवाची एक आगळीवेगळी मजा असते. २५ ते ३० फूट उंच गणेशमूर्ती, आकर्षक देखावे, सामाजिक संदेश देणारे उपक्रम मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून राबवण्यात येतात. मात्र, अंधेरी पूर्व, मरोळ येथील ईकॉम एक्स्प्रेसच्या वेदांता बिझनेस सेंटर कार्यालयात एक आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. तृतीयपंथी, गतिमंद मुलांनी पुठ्ठ्यांपासून ही गणेशमूर्ती साकारली आहे.

तृतीयपंथी, गतिमंद मुलांनी साकारली पुठ्ठ्याची गणेशमूर्ती! जिद्द व चिकाटी असेल तर काहीही शक्य
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

१००१ पुठ्ठ्यांच्या बॉक्सेसचा वापर करून ११ फूट उंच अशी ही गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. तृतीयपंथी आणि गतिमंद मुलांचा गणपती बनवण्याचा उत्साह आणि निर्मळ भाव पाहून ईकॉम एक्स्प्रेसच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन देत ही कलाकृती बनवण्यास मदत केली. सुमारे तीन तासांत ही बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली. पुठ्ठ्यापासून साकारण्यात आलेल्या या गणेशमूर्तीचे विसर्जन न करता या मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या प्रत्येक बॉक्समध्ये विशेष भेटवस्तू ठेवून हे बॉक्स कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहेत. अशारीतीने गणपती बाप्पा घराघरात जाणार आहे.

कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने हा विशेष बाप्पा साकारण्यात आला आहे. श्रीदेवी लोंढे, कवी किरण पाटील व नरेपार्क शाळेतील ८ तृतीयपंथी, गतिमंद मुलांनी गणपती बनवण्यासाठी योगदान दिले. हे सगळे घडवून आणण्यासाठी ईकॉम एक्स्प्रेसच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

समाजातील प्रत्येक घटकाला एकाच नजरेतून बघण्याची गरज !

समाजात वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक वास्तव्य करतात. त्यात तृतीयपंथी, गतिमंद मुलेही आलीच. समाजात प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. परंतु तृतीयपंथी, गतिमंद मुलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन तसा सकारात्मक नसतो. समाजातील प्रत्येक घटकाला आपले आयुष्य सन्मानाने जगण्याचा अधिकार असून, तृतीयपंथी व गतिमंद मुलांना एकाच व्यासपीठावर आणणे हा मुख्य उद्देश याद्वारे साधण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला त्यावेळी मुला-मुलींचे टोमणे ऐकावे लागत होते, मात्र तृतीयपंथीमध्ये पहिली पदवीधारक म्हणून मला देशात मान मिळाला. पण आजही लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. समाजातील एक घटक म्हणून प्रत्येकाला एकाच नजरेतून बघणे गरजेचे आहे, असे मत तृतीयपंथी श्रीदेवी लोंढे यांनी दैनिक ‘नवशक्ति'शी बोलताना व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in