नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग बंदच; कंत्राटदारांची प्रलंबित देयके न देण्याचा परिणाम

रुग्णालयाला उपकरणे पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके प्रलंबित असल्याकारणाने मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागातील काही भाग मागील पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग बंदच; कंत्राटदारांची प्रलंबित देयके न देण्याचा परिणाम
PM
Published on

मुंबई : रुग्णालयाला उपकरणे पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके प्रलंबित असल्याकारणाने मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागातील काही भाग मागील पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसापासून लेखा विभागाच्या वतीने कंत्राटदाराची प्रलंबित देयके देण्याचे काम सुरू आहे आणि या कामासाठी पुढील दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यानंतर हृदय शस्त्रक्रिया विभागातील रुग्णांवर बायपाससारख्या शस्त्रक्रिया पूर्ववत होणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. दरम्यान जोपर्यंत कंत्राटदाराचे देयके देण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शस्त्रक्रिया होणार नाही, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.

नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज तीन ते साडेतीन हजार रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. तर यामध्ये हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यापैकी कित्येक रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत नायर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया अल्प दरात केली जाते. यासाठी, हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वपूर्ण उपकरणे नायर रुग्णालय प्रशासनाकडून पुरविण्यात येतात. मात्र रुग्णालयाला ही उपकरणे पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. देयके मंजूर होत नसल्याने कंत्राटदारांनी उपकरणांचा पुरवठा पंधरा दिवसांपूर्वी अचानक बंद केला. त्यामुळे रुग्णालयामध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी बायपास शस्त्रक्रिया मागील पंधरा दिवसांपासून बंद करण्यात आल्या आहेत.

रुग्णालय प्रशासनाच्या या प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे. शस्त्रक्रिया गरजेची असलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला विभागीय डॉक्टर देत असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.

नायर रुग्णालयामध्ये पालिकेच्या वतीने उपचार मिळत असले तरी औषधे खासगी मेडिकलमधूनच घ्यावी लागतात. तसेच, इथे आजारावर तात्पुरते उपचार न मिळता पूर्ण उपचार मिळवण्यासाठी पायाचे जोडे झिजवावे लागतात. रुग्णालयातील कित्येक यंत्रणा बंद असल्याने आम्हाला खासगी केंद्रामध्ये तपासणी साठी जावे लागते. परिणामी आमच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे.

- रुग्णालयातील रुग्ण

संपूर्ण शस्त्रक्रिया विभाग बंद झाला नसून, फक्त बायपास शस्त्रक्रिया बंद झाल्या आहेत. मागील तीन दिवसापासून लेखा विभागाकडून देयके मंजूर करण्याचे काम सुरू आहे. बँकेकडून देयकांची रक्कम लवकरच कंत्राटदाराच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असून लवकरच शस्त्रक्रियागृहातील सुविधा सुरळीत होईल.

- डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

logo
marathi.freepressjournal.in