
मुंबई : कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम दिनांक १० जून पर्यंत पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा. तसेच उर्वरीत कामे पुढील ५३ दिवसांत पूर्ण करण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.
लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. रेल्वे मार्गावर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आली आहे.
दरम्यान कर्नाक उड्डाणपूल १० जूनपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. पूर्व दिशेकडील कामे अद्याप बाकी आहेत. यासाठी सर्व लोखंडी तुळया २७ एप्रिलपर्यंत प्रकल्पस्थळी उपलब्ध करू. २ मेपर्यंत तुळया स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण करून ५ जून २०२५ पर्यंत दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते तयार करण्याचे निर्देश बांगर यांनी दिली. तसेच ७ मे पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिटीकरण करून १० जून पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.