मुंबई : संस्थेच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सातजणांविरुद्ध नवघर पोलिसांनी अपहारासह फसवणूक, महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मिलिंद के राहुल, विश्वेश आर चव्हाण, एस. एस देशपांडे, अविनाश मंडपे, वसंत डोंगरे, प्रदीप निलवर्ण आणि उल्हास पी तांबे अशी या सातजणांची नावे असून ते सचिन सहकार सोसायटीचे पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलुंडच्या मिठागर रोडवर सचिन सहकारी सोसायटीचे एक कार्यालय आहे. १ एप्रिल ते २२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत संस्थेचे चिटणीस मिलिंद राहुल, अध्यक्ष विश्वेश चव्हाण, खजिनदार एस. एस देशपांडे, सदस्य उल्हास तांबे, अविनाश मंडपे, वसंत डोंगरे, प्रदीप निलवर्ण यांनी विविध कामासाठी संस्थेचे ५ लाख ६२ हजार रुपये काढले होते. या पैशांचा कुठलाही हिशोब न देता विविध कामासाठी संबंधित पैसे खर्च झाल्याचे सांगितले होते. त्यापैकी काही व्हाऊचर लेखा परिक्षण करताना सापडले, तर काही व्हाऊचर गहाळ झाल्याचे दिसून आले होते. ही रक्कम त्यांनी कुठे खर्च केली याबाबत त्यांच्याकडून लेखी उत्तर देण्यात आले नव्हते. त्यापैकी १ लाख ६५ हजार ८५० रुपये राजन्ना नावाच्या व्यक्तीला देण्यात आले होते; मात्र ही रक्कम त्याला का देण्यात आली होती याबाबत त्यांनी खुलासा केला नव्हता. मूळात पंधरा हजारापेक्षा अधिक रक्कम काढताना ही रक्कम चेकद्वारे देणे बंधनकारक असते; मात्र या सर्व नियमांचे उल्लघंन करण्यात आले होते.