सफाई कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, जोगेश्वरीतील घटना; घरातच नायलॉनच्या दोरीने घेतला गळफास

वरिष्ठांसह सहकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून ४२ वर्षांच्या एका मनपा कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सफाई कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, जोगेश्वरीतील घटना; घरातच नायलॉनच्या दोरीने घेतला गळफास

मुंबई : वरिष्ठांसह सहकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून ४२ वर्षांच्या एका मनपा कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष अर्जुन सोनावणे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

जोगेश्वरीतील आनंदनगर, सर्वोदय कॉलनीत सुभाष सोनावणे हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होते. सध्या ते गोरेगाव येथील महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होते. त्यांची मुलगी आजारी असल्याने ते एक महिन्यांपासून रजेवर होते. आठ दिवसांपूर्वी ते पुन्हा कामावर हजर राहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचे वरिष्ठ अधिकारी जिया कोटेन आणि सहकारी असलेले दोन मुकादम यांनी त्यांना हजर करून घेण्यास नकार दिला. त्यांना वरिष्ठांना भेटू दिले नाही. कामावर हजर होण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते; मात्र पैसे घेऊनही त्यांना कामावर ठेवले नाही. त्यांच्याकडून त्याचे मानसिक शोषण सुरू होते. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराशातून शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी जिन्याजवळील दरवाज्याच्या कडीला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in