
मुंबई : घाटकोपर येथे राहणाऱ्या श्रद्धा तेजस सावंत या २४ वर्षांच्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजस जयवंत सावंत, तेजश्री जयवंत सावंत आणि जयवंत सावंत अशी या तिघांची नावे आहेत.
तेजस हा श्रद्धाचा पती तर तेजश्री आणि जयवंत हे सासू-सासरे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार तरुण डोबिवली येथे राहत असून भारतीय रेल्वेत कामाला आहे. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याची श्रद्धा ही बहीण आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिचा तेजस सावंत याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर ती तेजसच्या घाटकोपर येथील घरी गेली होती.
काही महिन्यांत त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. श्रद्धासोबत प्रेमसंबंध असताना तेजसने इतर काही तरुणीशी मैत्री होती. त्यांचे काही फोटो त्याच्या मोबाईलमध्ये श्रद्धाने पाहिले होते. याच कारणावरून त्यांच्यात वाद होते. सततच्या वादानंतर श्रद्धाला त्याच्या भावाने राहत्या घरी आणले. दुसऱ्या दिवशी तेजस तिथे आला. यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. भांडणानंतर श्रद्धाने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती वाचली. त्यानंतर त्यांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवून दिले.
२४ नोव्हेंबरला तेजस आणि श्रद्धा यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्यात जयवंत सावंत यांना छातीत दुखू लागले होते. यावेळी तिची सासू तेजश्रीने तिला धमकी दिली. सतत होणारा वाद सासरच्यांकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने रात्री उशिरा तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रद्धाच्या भावाच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.