
मुंबई : कोविड काळात रेमडिसीवीर खरेदीत घोटाळा झाल्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. हा घोटाळा ५.९६ कोटी रुपयांचा आहे.
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, २१ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान रेमडिसीवीर इंजेक्शनची खरेदी केली. या इंजेक्शनच्या खरेदीचे कंत्राट मायलन लॅबोरेटरी लिमिटेडला मुंबई मनपाने दिले होते. दोन वेळा मनपाने त्यांच्याकडून या इंजेक्शनची खरेदी केली. पहिल्या टप्प्यात मायलनकडून ४० हजार डोस मुंबई मनपाला दिले. त्यावेळी प्रत्येक डोसची किंमत ६५० रुपये होती, तर काही दिवसांनी मुंबई मनपाने मायलनला दुसरी ऑर्डर दिली. त्यावेळी प्रत्येक डोसची किंमत १५६८ रुपये होती. दुसऱ्या टप्प्यात मुंबई मनपाने दोन लाख रेमडिसीवीरच्या ऑर्डर दिल्या होत्या. एकाच कंपनीला दोन वेळा ऑर्डर दिली, मात्र दरांमध्ये फरक कसा, याचा तपास केला जाणार आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मायलन लॅबोरेटरी लिमिटेड, मुंबई मनपाचा अधिकारी यांच्याविरोधात तपास सुरू केला आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
यंदा जानेवारी २०२३ मध्ये राज्याच्या लोकायुक्तांनी मुंबई मनपाला रेमडिसीवीर इंजेक्शनच्या खरेदीत क्लीनचिट दिली होती. या इंजेक्शनच्या खरेदीत मुंबई मनपा व अन्य सरकारी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला.