पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांपुढे भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही. त्यामुळे खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करणे अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मालाड येथील अक्सा बीचवर खोल समुद्रात गेलेले १९ अतिउत्साही पर्यटक भोवऱ्यात अडकले, मात्र त्याठिकाणी उपस्थित लाईफगार्डच्या प्रसंगावधानाने १९ जणांना जीवनदान मिळाले आहे. सुरक्षारक्षकांनी जीवाची पर्वा न करता १९ जणांचा जीव वाचवल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
सांताक्रूझ दत्त मंदिर रोड येथे राहणारी पाच मुले जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेली होती. जुहू येथे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत चार मुलांचा बूडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर गिरगांव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या प्रमुख चौपाट्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सर्व प्रमुख चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, अग्निशमन दलाकडून कंत्राटी पद्धतीने ९४ जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुहूच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी एक आठवडाभर सर्व चौपाट्यांवर पर्यटकांना बंदी घातली होती. तरीही १८ जून रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. दुपारी तीननंतर पर्यटकांची गर्दी आणखीन वाढू लागली. सायंकाळी ४.४५ ते ६.४५ या वेळेत गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते.
याचदरम्यान चेंबूर, मालाड मालवणी, कांदिवली, बोरिवली अशा विविध भागात राहणारे सुमारे ४० हून अधिक पर्यटक पाण्यात उतरले होते. समुद्रातील ज्या भागात हे पर्यटक गेले होते, तिथे नैसर्गिक भोवऱ्याच्या खड्ड्यात पर्यटक खेचले जाऊ लागले. त्यावेळी एकनाथ तांडेल, भरत मानकर, समीर कोळी, मिलन पाटील, प्रसाद बाजी, विराज भानजी, जयेश कोळी या दृष्टी लाईफ सेव्हिंगच्या जीवरक्षकांनी पर्यटकांना समुद्राबाहेर पिटाळून लावले. मात्र तरीही १९ जण आतमध्ये अडकले होते. त्यांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. १९ पैकी १० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ९ जण पळून गेले, अशी माहिती समोर आली आहे.