मुलांच्या नैराश्येची कारणे

मुलांच्या नैराश्येची कारणे

आत्महात्येचा विचार मनात डोकावणं, आत्महत्येचा विचार करणं आणि प्रत्यक्ष आत्महत्या करणं या तीनही गोष्टी जगण्यासाठी मारकच ठरतात.

आत्महत्या करणं म्हणजे स्वत:चा जीवन प्रवास संपवणे. अनैसर्गिक मृत्यूच्या अधीन होणं. अलीकडे छोटी छोटी मुलंही आत्महत्या करत असल्याच्या बातम्यानी मन घाबरतं. एक दुसरीतील मुलगा बाहुलीशी खेळत होता. खेळताना त्याने त्याच्याजवळच्या बाहुलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. 

इतक्या लहान मुलाला त्या बाहुलीला का मारावेसे वाटले असेल. त्यानंतर आपणही अशा पद्धतीने गळफास लावण्याचा खेळ खेळावासा का वाटला असेल. काही मुलं रागाच्या भरात आत्महत्या करत आहेत. पालकांनी मोबाइल दिला नाही. कुत्रा पाळू दिला नाही. अभ्यासावरून रागावलं, मित्राच्या पार्टीला पाठवलं नाही, मार्क कमी पडले, शाळेत सोडायला चारचाकी गाडी पाहिजे, इतकंच नाही ड्रायव्हर पाहिजे, मित्र घरी आला, तेव्हा आईने चांगला ड्रेस घातला नव्हता, आई नोकरी करत नाही, आई-बाबा सतत भांडतात, अशा कोणत्याही कारणास्तव मुलं आत्महत्येचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने काहीना त्यात यश मिळतं. लहान मुलं मोठ्यांचं, स्क्रीनवरील दृष्यांचं, आजूबाजूच्या लोकांचं अनुकरण करतात. मुलांना अनेक गोष्टी करून बघायच्या असतात. कधी उत्सुकता तर कधी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी उपदव्याप ही मुलं करत असतात. 

सीतेला पळवून नेणारा रावण हा रामायणातील महा खलनायक होता. असे असले तरी तो एक शूर राजा होता. अत्यंत बुद्धिमान होता. असं कुणीतरी सांगितलं तर सांगणाऱ्याला लोक बडवून, पळवून लावतील. आजही रावण प्रतिमेला जाळण्याचे प्रकार आनंदोत्सव म्हणून साजरे होतात. रावण वाईट प्रवृत्तीचा होता. आज अनेक रावण आपल्या घरात तयार होऊ लागले आहेत. त्याला रोखण्याची तयारी पालकानी सुरू करायला हवी. नाहीतर अशा रावण प्रवृत्तीला कुणी जाळायची गरज नाही. आपण आपलं ते संपतील. आत्महत्येचं शस्र सारखं दिसायला लागेल, किंबहुना ते दिसत आहे. सतत मुलं काहीतरी करून घेतील, याची धास्ती बऱ्याच पालकांना आहे. आपल्या मुलांचे विचार स्क्रीनमुळे जळत आहेत. स्क्रीनमुळेच मुलांना त्यांच्या भावनांचं आकलन होणं बंद होत आहे. त्यांना स्वत:च्या भावना समजत नाहीत. सतत स्क्रीनवरच्या आभासी जगतातील अनैसर्गिक भावनांशी मुलं जोडली जात आहेत. म्हणून स्क्रीन हा राक्षस आहे, असं नाइलाजाने का होईना म्हणावे लागते. या राक्षसाकडेही चांगले गुण आहेत ना; पण ते सतत दिसत नाहीत. चांगल्या गोष्टी स्क्रीनवर शोधाव्या लागतात. वाईट गोष्टी सतत उड्या मारत समोर येतात. त्या गोष्टी बोटांच्या ओझरत्या स्पर्शानेदेखील टुणकन उघडल्या जातात. ज्यामुळे मुलांपासून लपवून ठेवलेल्या गोष्टी सहज दिसतात. कुतूहल संपतं. नको ती माहिती मिळते. मिळालेल्या माहितीचं कृतीत रूपांतर करण्याची घाई होते. जसं कोणत्याही राक्षसाचं वाईट रूपच समोर येतं. तसंच स्क्रीनच्या बाबतीत होतं. 

स्क्रीनवर खूप गोष्टी चांगल्या असतात; पण मुलांना नयनसुख देणारे, सतत नवीन गोष्टींचं कुतूहल शमवणारे, कधीच बोअर वाटणार नाही, असे विविध नमुने, खायचं आहे नवीन काहीतरी शोधा, पत्ता शोधायचा आहे, गुगल मॅपला विचारा, कोणत्याही प्रकारचं गाणं ऐकायचं आहे. लगेच इच्छा पूर्ण होणार. खेळायचं आहे, भरपूर खेळ उपलब्ध आहेत. खरेदी करायचं आहे, ऑनलाइन करा. घरपोच सेवा नाही म्हणता येणार, इतकंच नाही घरात बसल्या ठिकाणी सगळं उपलब्ध होत आहे.

नोकरी व्यवसायसुद्धा घरबसल्या होऊ लागला आहे. शेतीचीही बरीच कामं घरी बसल्या होऊ लागली आहेत. या सुविधांमुळे लोकांचा वेळ वाचतो, असं म्हणायला हरकत नाही; पण वाचलेल्या वेळेचं करायचं काय म्हणून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायचं. वेळ भरपूर उरतो म्हणून नवीन काहीतरी शिकणं, लोकांच्या उपयुक्त कामं करणं, स्वत:चा शोध घेणं, या चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात; परंतु जिभेला जे चांगलं लागतं ते पचायला जड असतं. तसंच ज्या गोष्टीमुळे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मज्जा येते. त्या करताना मेंदूलाही भारी वाटतं, त्याच गोष्टी केल्या जातात. ज्या तुम्हाला सारख्या सारख्या कराव्या वाटतात. त्यातूनच चांगल्या वाईट सवयी लागतात. सवयींचा अतिरेक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते.

मुलांना वेगवान जीवनशैलीचं आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे. काही क्षणही मुलांची नजर एकाच चित्रावर, एकाच चॅनलवर, एकाच दृष्यावर, जेवणाच्या ताटाकडे, जेवणाकडे, स्थिर राहत नाही. अभ्यास कसा करतील. मग तक्रारी येतात. मुलांची एकाग्रता कमी झाली आहे. ती अभ्यास करत नाहीत. एकाग्रतेचं महत्त्व पटवून द्यायला हवं.

एकाग्रतेसाठी ध्यान, मैदानी खेळ याचे धडे द्यायला हवेत. नाहीतर मुलांच्या विचारांचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवे.

मुलांना आत्महत्येचा विचार करायला कुणी शिकवलं. पालक तर तसं काही घरात बोलतही नाहीत. लहान मुलं प्रत्यक्ष किती आत्महत्या बघतात. तीही शक्यता कमीच. मग हे विचार येतात कुठून याचा विचार करायला हवा. आभासी वेगवान आयुष्य आणि प्रत्यक्षातील संथ, शांत, अनुभव देणारं वास्तव याची मुलं सांगड घालू शकत नाहीत. आत्ताच्या आत्ता हवं. हवं म्हणजे हवं, यात अडकत जातात.

तुझेच गीत मी गात आहे, यासारख्या मालिकेमध्ये दोन मुली आहेत. एक करोडपती पिहू आहे. तिच्या आईला तिने गाण्यात करिअर करावं, असं वाटतं; पण पिहू अत्यंत उद्धट दाखवली आहे. सतत ‘माय लाईफ इज बोअरिंग’ अशी त्या बालवयाला न शोभणारी वाक्य ती बोलत असते. दुसऱ्‍या बाजूला शांत, संयमी गाण्याची प्रचंड जाण असणारी, श्रम घेणारी, अत्यंत गरीब अशी स्वरा आहे; 

परंतु आत्ताच्या आत्ता गाणं मला यायलाच हवं, असं म्हणणाऱ्या पिहूचं अनुकरण मोठ्या प्रमाणात होणार हे उघड आहे. फास्ट फूडच्या जमान्यात फास्ट रिझल्टही हवाच.

एकच फ्रॉक रोज घालणारी, दोन वेण्या, घरातील कामं करणारी मुलगी लहान मुलांना आवडेलच असं नाही. आपण मुलांना काय देत आहोत. आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगण्याचे धडे की, कितीही श्रीमंत असलं तरी जगण्याचा कंटाळा शोधण्याच्या क्लृप्त्या. 

मुलांनी स्वत:च्या विचारांना मारून स्क्रीनच्या विचारांवर अवंलबून राहू नये, असं वाटत असेल तर वेळ देऊन वेळेत स्क्रीनच्या सवयी बदलायला हव्यात. त्यासाठी पालकांनी स्वत:चं स्क्रीनटाईम कमी करायला हवं. मुलांना पर्याय द्यायला हवेत. मैदानी खेळ हा सगळ्यात स्वस्त, सोयीचा पर्याय आहे. तो मुलांना उपलब्ध करून द्यायला हवा. अभ्यासाच्या वेळापत्रकात ऑनलाइन खेळाचे तास बंद करायला हवेत. अवांतर वाचन हवंच. मुलांना पुस्तकं सहज उपलब्ध करून द्यावीत. पालकांनी पुस्तकं वाचावीत. वाचनालयाची सफर घडवून आणावी. कर्तृत्ववान लोकांना भेटवावं. स्क्रीन वरवर कितीही चांगली असली तरी जर त्यातील योग्य अयोग्य समजलं नाही, तर स्क्रीनही खतरनाक ठरते. मुलं निराश होण्याची कारणं स्क्रीनमध्ये आहेत. हे लक्षात ठेवावे. पालकांनी गरजेनुसार; पण वेळीच समुपदेशकांची मदत घ्यावी. कायमस्वरूपी स्क्रीन बंद होऊ शकत नाही; पण किमान स्क्रीन टाईम कमी करणे निश्चितच शक्य आहे.

 मुलांच्या आणि पालकांच्या हातातील स्क्रीन ठरवून काही काळ बंद ठेवायला हवी. मुलांच्या स्क्रीनवर लक्ष हवे. काय बघायचे हे ठरलेले असावे. योग्य गोष्टींची जाणीव असावी, ज्यामुळे मुलांच्या मनातील आत्महत्येचे विचार नष्ट होतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in