उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने केली अटक

उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने केली अटक
Published on

पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. येस बँक-डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

दिल्लीतील सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. भोसले यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्यांना कोठडीत ठेवण्याची मागणी केली जाईल.

३० एप्रिल रोजी सीबीआयने मुंबई व पुण्यातील आठ ठिकाणी छापे मारले होते. या जागा शाहीद बलवा, विनोद गोयंका व अविनाश भोसले यांच्याशी संबंधित होत्या. सीबीआयने गेल्याच महिन्यात बिल्डर संजय छाब्रीया याला अटक केली होती.

सीबीआय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, डीएचएफएलने मेसर्स रेडियस इस्टेट प्रोजेक्टस प्रा. लिमिटेडला ११०० कोटी तर सुमेर रेडियस रिअल्टी प्रा. लिमिटेडला ९०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. या दोन्ही कंपन्या छाब्रीयाच्या मालकीच्या होत्या. कपिल वाधवान यांच्या डीएचएफएलने मे. रॅडियस इस्टेट अँड डेव्हलपर्स प्रा. लिमीटेडला ४१६ कोटी रुपये कर्ज मंजूर केले.

सीबीआयने आपल्या अर्जात नमूद केले की, येस बँकेने बेलिफ रिअल्टर्स प्रा. लिमिटेडला (बीआरपीएल) ७५० कोटींचे कर्ज मंजूर केले. त्यातील ६३२ कोटी रुपयांची रक्कम बीआरपीएलने डीएचएफएलकडे हस्तांतरित केली. त्यानंतर डीएचएफएलने तीच रक्कम मे. फ्लॅग इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लिमिटेड आणि छाब्रीयाच्या अन्य कंपन्यांना २९ सप्टेंबर २०१८ मध्ये वळती केली.

अविनाश भोसले यांचे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांकडून काही दिवसापूर्वी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी केली होती.

अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयने चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएचएफल कर्ज प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. तेव्हा ४०.३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.

logo
marathi.freepressjournal.in