सीबीएसई शाळांची संख्या वाढवणार,मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या माहिती

यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळा सुरु केल्या आहेत
सीबीएसई शाळांची संख्या वाढवणार,मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या माहिती

माया नगरी मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून वाहन पार्किंगची गैरसोय दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, सीबीएसई शाळांची संख्या वाढवणे आदी विषयांवर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘नवशक्ति’ला माहिती दिली.

प्रश्न : सीबीएसई शाळांची संख्या वाढवा, अशी मागणी पालकांकडून होऊ लागली आहे. काय सांगाल?

अश्विनी भिडे : सीबीएससी शाळा म्हणून घोषणा करुन उपयोग नाही, तर त्यासाठी मान्यता घ्यावी लागते. शिक्षक, मुख्याध्यापक आदींची उपलब्धता असणे गरजेचे असून सगळ्या गोष्टी एकाच दिवशी होणे शक्य नाही. यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळा सुरु केल्या आहेत. आता ज्या शाळा सुरु केल्या, त्या लहान मुलांच्या असून त्या योग्यरीत्या सुरु झाल्या तर भविष्यात टप्याटप्याने सीबीएसईच्या शाळा सुरु करण्यावर भर दिला जाईल.

प्रश्न : विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन काय संकल्पना राबवणार?

अश्विनी भिडे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यानंतर आताच शाळा सुरळीत सुरु झाल्या आहेत. दोन वर्षे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढणे, शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे या गोष्टी करताना विद्यार्थ्यांमधून ब्रॅन्ड ॲम्बेसिडर विद्यार्थ्याची निवड करत अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने संकल्पना राबवण्यात येईल.

प्रश्न : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे?

अश्विनी भिडे : ९० मीटरपर्यंत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता मुंबई अग्निशमन दलाची आहे. परंतु ९० मीटर पेक्षा उंच इमारतीत आगीची घटना घडली तर ड्रोनच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल का, याचा अभ्यास करण्यात येत आहे. किती उंचीपर्यंत ड्रोन जाऊ शकतो, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर करायचा की आगीच्या घटनेवेळी कोणी अडकले आहे, ही माहिती घेण्यासाठी वापर करायचा, घटनेवेळी आणखी काही माहिती उपलब्ध होईल का, याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. ड्रोनच्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांबरोबर चर्चा सुरु आहे पार्किंगची व्यवस्था नसल्याने राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते. त्यावर काय उपाय केले जात आहेत?

अश्विनी भिडे : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची संख्या २५ हजारांच्या घरात जाते. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता नव्याने नुतनीकरण होत असलेल्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत नक्कीच प्रयत्न करु.

प्रश्न : गणेशोत्सव जवळ येत असताना भक्तांना काय आवाहन कराल!

अश्विनी भिडे : मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नसल्याने गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तरीही कोरोनाची चौथी लाट धडकली असली गणेशोत्सवात गर्दी टाळावी, तोंडावर मास्कचा लावावा, हात स्वच्छ धुवावेत एकूण कोरोना नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अश्विनी भिडे यांनी दैनिक 'नवशक्ति'च्या माध्यमातून गणेश भक्तांना केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in